मुंबई : दर महिन्याच्या ७ ते ८ तारखेपर्यंत एसटीच्या कर्मचा-यांचा पगार होत असतो मात्र आता ९ तारीख उलटून देखील अद्याप कर्मचा-यांचे पगार झाले नाहीत. राज्य सरकारकडून सवलतींची रक्कम न आल्याने एसटी कर्मचा-यांचा पगार रखडला असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी मंडळाचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. तसेच शासन एसटी कर्मचा-यांसंदर्भात गंभीर नसल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.
एसटी कर्मचा-यांचे पगार पुन्हा रखडले आहेत. एसटी महामंडळाकडून मागणी केलेली ३२७ कोटी रुपयांच्या डिसेंबर महिन्यातील विविध सवलतींच्या रकमेची पूर्ती राज्य सरकारकडून न झाल्याने पगार रखडला आहे. एसटी कर्मचा-यांचा पगार सर्वसाधारण दर महिन्याच्या ७ ते ८ तारखेपर्यंत होत असतो. एसटी कर्मचा-यांची संख्या जवळपास ८८ हजारांच्या घरात आहे.
शासन सहानुभूतीच्या फक्त गप्पा मारते. महाराष्ट्र एसटी कर्मचारी मंडळाचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले, राज्य सरकारकडून सवलतींची रक्कम न आल्याने एसटी कर्मचा-यांचा पगार रखडला आहे. शासन एसटी कर्मचा-यांसंदर्भात गंभीर नाही. शासन सहानुभूतीच्या फक्त गप्पा मारते, जाहिरातीत फक्त गप्पा दिसतात. राज्य सरकारने तात्काळ एसटी कर्मचा-यांच्या वेतनासाठी पैसे द्यावे.
एसटी कर्मचा-यांच्या संपात वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखे दरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रि-सदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण या महिन्याची ९ तारीख उलटून गेली तरी सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचा-यांना वेतन मिळालेले नाही, हा न्यायालयाचा अवमान असून शिंदे- फडणवीस सरकारची ही कामगारविरोधी भूमिका उघड झाली आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
वेतन कधी मिळणार?
एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असल्यामुळे कर्मचा-यांच्या वेतनासाठी चार वर्षे सरकारच्या बजेटमध्ये तरतूद केली जाईल आणि महिन्याला लागणारी पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखे दरम्यान वेतन देण्याचे सरकारच्या वतीने न्यायालयात संप काळात मान्य केले होते. सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचा-यांना वेतन मिळालेले नाही. आता अजून काही दिवस वेतन लांबेल अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पगाराला उशीर होत असल्याने कर्मचा-यांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे.