पुणे : प्रतिनिधी
एसटी महामंडळाने नुकतीच लालपरीच्या प्रवास भाड्यात १५ टक्के दरवाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला झळ बसत आहे. एसटीने वाढविलेल्या प्रवास भाड्यामुळे महागाईवर मात करण्यासाठी आता अनेकांनी दुचाकीचा मार्ग अवलंबला आहे. एसटीने एका व्यक्तीला एक किलोमीटर प्रवास करण्यासाठी १.८५ ते २.८३ रुपये मोजावे लागत आहेत. तर एवढ्याच प्रवासासाठी दुचाकीने प्रवास करण्यासाठी दोन व्यक्तींना केवळ २ रुपये खर्च येतो.
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलतीमुळे तसा विशेष फरक पडणार नाही. मात्र, इतरांना काही प्रमाणात हा भार सोसावा लागत आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने सर्वसामान्य प्रवासी लालपरीलाच पसंती देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर अनेकांनी दुचाकीचा प्रवास टाळून एसटीने प्रवास सुरू केला होता. नुकतीच एसटीने १५ टक्के दरवाढ लागू केल्याने विशेषत: ग्रामीण भागातील नागरिक पुन्हा दुचाकीकडे वळले आहेत. दुचाकीवर दोघांना प्रवास करता येत असल्याने खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे.
एका व्यक्तीला एसटीला सुमारे ५० किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी साध्या गाडीने ९२ रुपये, शिवशाही १३३ रुपये, तर शिवाईला १२५ रुपये आणि १४५ रुपये मोजावे लागत आहेत. तर दुचाकीने एवढ्याच अंतरासाठी १०५ रुपयांत दोघांचा प्रवास होत आहे. म्हणजे एका व्यक्तीच्या वाट्याला ५० ते ५५ रुपये खर्च येणार आहे. याच अंतरासाठी मात्र, एसटीला दुप्पट रक्कम द्यावी लागत असल्याने अनेकांनी शेअरिंग दुचाकीचा पर्याय निवडला असल्याचे दिसून येत आहे.
सुरक्षेसाठी एसटीलाच पसंती
एसटीचा प्रवास जरी महागला असला तरी अनेक जण आजही एसटीलाच पसंती देत आहेत. कडक उन्हाळा आणि पावसाळ्यात दुचाकीवर प्रवासादरम्यान येणा-या अडचणी आणि असुरक्षित प्रवासामुळे दरवाढ झाली असली तरी सुरक्षित प्रवासासाठी एसटीलाच प्राधान्य देत असल्याचे ग्रामीण भागातील पालांदूर-भंडारा, पालांदूर-लाखनी असे रोज ये-जा करणा-या प्रवाशांनी सांगितले.