पुणे : प्रतिनिधी
राज्यातील एसटी कर्मचा-यांच्या पगाराला उशीर होत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. कर्मचा-यांना पगारही थकीत ठेवल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मात्र,े चक्क एसटी कर्मचा-यांच्या पीएफचे पैसेच महामंडळाने गेल्या ४ महिन्यांपासून भरले नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाने बस दरात १५ टक्के भाडेवाढ करत ही भाडेवढ गरजेचं असल्याचं म्हटलंय. सरकार नव्या बस घेत असून महामंडळाच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष केंद्रीत करत ही भाडेवाढ महत्त्वाची असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते. ऑक्टोबर महिन्यापासून एसटी महामंडळाने पीएफचे हफ्ते भरले नसल्याने ज्या कर्मचा-यांना आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत, त्यांना ते पैसेच काढता येईना झालेत.
मुलीच्या लग्नासाठी, नवीन घर विकत घ्यायचे असेल किंवा नवे घर बांधायचे असल्यास पीएफचे पैसे काढता येतात. मात्र, एस.टी.कर्मचा-यांना त्यांच्या प्रॉव्हीडंट फंडाच्या रकमेतून रक्कम काढायची असेल तर ती सध्या काढता येत नाही. कारण, एस.टी. महामंडळाकडे निधीचा तुटवडा असल्याने प्रॉव्हीडंट फंडासाठीचे हप्ते भरणे महामंडळाला जमलेले नाही. ऑक्टोबर महिन्यापासून हे हप्ते थकीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महामंडळाला मिळणारा निधी हा कर्मचा-यांच्या मासिक पगारावर खर्च करावा लागतोय, असे एसटी महामंडळाचे अधिकारी सांगतात.
सध्या तोट्यात असलेल्या महामंडळाला एसटी कर्मचा-यांच्या पीएफमधील रक्कम भरण्यासाठी राज्य सरकारकडून निधीची अपेक्षा आहे. मात्र, अद्याप तरी राज्य सरकारने निधी दिलेला नाही. विशेष म्हणजे जे कर्मचारी सेवानिवृत होत आहेत, त्यांचा फंड मात्र एक महिन्याच्या आत दिला जात आहे.
परंतु, जे कार्यरत असलेले कर्मचारी आहेत, त्यांना विविध कारणांसाठी आपल्या फंडातील रक्कम काढायची असल्यास त्यांना वेट अँड वॉच अशी भूमिका महामंडळाचे आहे. त्यामुळे, एसटीच्या कर्मचा-यांना आर्थिक तंगी सहन करावी लागत आहे. आमच्या मागण्यांकडे शासन किंवा महामंडळातील अधिकारी लक्ष देतील का, असा सवाल यानिमित्ताने एसटी कर्मचा-यांनी विचारला आहे. दरम्यान, एसटी महामंडळाला कर्मचा-यांच्या पीएफ हप्त्यासाठी महिन्याला 480 ते 490 कोटी रुपयांच्या निधीची गरज असते.
गिरीष देशमुख यांची चौकशी करा – गुणरत्न सदावर्ते
हे अत्यंत वेदनादायी आहे, कष्टकरी-कामगारांच्या पीएफच्या हफ्त्याचे पैसे पाठवले जात नाहीत, हे भरत गोगावले अध्यक्ष असल्यापासून सुरू झालं आहे. तसेच, सध्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनाही याबाबत 1 आठवड्यांपूर्वीच माहिती दिली आहे. गिरीष देशमुख नावाचे अधिकारी आहेत, जे दुस-या कामासाठी कामगारांच्या हक्काच्या पैशाचा वापर करण्यासाठी देत आहेत. त्यामुळे, गिरीष देशमुख यांची चौकशी झाली पाहिजे, असे कामगार संघटनेचे नेते एड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.