17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयऐन उन्हाळयात राज्यात वीज निर्मितीचे संकट?

ऐन उन्हाळयात राज्यात वीज निर्मितीचे संकट?

नागपूर : प्रतिनिधी
राज्यात विजेची मागणी वाढत असतानाच वीज निर्मितीही वाढली आहे. परंतु महानिर्मितीकडे केवळ १५ दिवस पुरेल एवढाच कोळसा साठा शिल्लक आहे. महानिर्मितीची स्थापित वीजनिर्मिती क्षमता १३ हजार १५२ मेगावॉट आहे. त्यामध्ये कोळसा आधारित औष्णिक विजेचा वाटा ९ हजार ५४० मेगावॅटच्या जवळपास आहे. कंपनीच्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातून सध्या रोज सरासरी ७ ते ८ हजार मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. दरम्यान, राज्यात विजेची मागणी वाढत असतानाच केवळ १५ दिवसांच्या कोळसा साठ्यामुळे चिंता वाढली आहे.

महानिर्मितीकडे १७ एप्रिल २०२४ रोजी २१ लाख ३० हजार ५४७ मेट्रिक टन कोळसा (१५ दिवस) होता. अधिक वीज मागणीमध्ये हा साठा किमान २२ दिवसांचा असावा, असा केंद्रीय ऊर्जा आयोगाचा निकष आहे. परंतु त्याहून कमी साठा आहे. गेल्यावर्षी १७ एप्रिल २०२३ रोजी महानिर्मितीकडे १७ लाख १४ हजार ९३४ मेट्रिक टन (१२ दिवस) कोळसा साठा होता. त्यात कोराडी प्रकल्पातील २३ दिवस, खापरखेडा २२ दिवस, चंद्रपूर प्रकल्पातील १६ दिवसांच्या साठ्याचा समावेश होता. परंतु नाशिक प्रकल्पात दीड दिवस, भुसावळ दीड दिवस, पारस २ दिवस, परळी ३ दिवस पुरेल एवढा साठा होता. त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. परंतु आता एप्रिल २०२४ मध्ये चंद्रपूरमध्ये १४ दिवस, कोराडी २५ दिवस, खापरखेडा १० दिवस, नाशिक ८ दिवस, भुसावळ २४ दिवस, पारस १५ दिवस, परळी १५ दिवस पुरेल एवढा साठा आहे. त्यामुळे गेल्यावर्षीहून स्थिती सुधारली आहे.

राज्यात पावसाळ््यात महानिर्मितीला रोज सुमारे ८० हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. परंतु एप्रिल-मे महिन्यात विजेचा वापर वाढत असल्याने महानिर्मितीला निर्मिती वाढवावी लागते. सध्या वीज निर्मिती वाढल्याने महानिर्मितीला पूर्ण क्षमतेने संच चालवावे लागत आहेत. त्यामुळे रोज १ लाख ३० हजार मेट्रिक टन कोळसा लागत आहे. उन्हाळ््यात जास्त कोळसा लागत असल्याने मोठ्या प्रमाणात कोळसा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सध्या १५ दिवस पुरेल एवढाच कोळसा असल्याने वीज निर्मिती धोक्यात येऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्यात २८ हजार मेगावॉटवर मागणी
राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विजेची मागणी सतत २८ ते २९ हजार मेगावॅटच्या जवळपास आहे. त्यातील २४ ते २५ हजार मेगावॅटची मागणी महावितरणची आहे. मुंबईत साडेतीन ते चार हजार मेगावॅट मागणी आहे. ही मागणी राज्यात २५ मार्चला २४ ते २५ हजार मेगावॅटच्या जवळपास होती. त्यातील महावितरणची मागणी २१ हजार ४९४ मेगावॅट तर मुंबईची मागणी ३ हजार मेगावॅटच्या जवळपास होती.

कोळशाचा साठा वाढविण्याचा प्रयत्न
महानिर्मितीकडून सर्वाधिक वीज निर्मितीचा विक्रम सातत्याने नोंदवला जात आहे. व्यवस्थापकीय संचालकांच्या सूचनेनुसार कोळशाचे नियोजन केल्यानेच ते शक्य झाले. सध्या पूर्ण क्षमतेने वीज निर्मितीनंतरही गेल्या काही दिवसांत महानिर्मितीचा कोळसा साठा वाढला. गरजेनुसार आणखी कोळशाचे नियोजन केले जात आहे, असे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR