औसा : प्रतिनिधी
औसा तालुक्यामध्ये मागील आठ दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून शनिवारी वादळी वा-यासह पडलेल्या अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास औसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने शेतक-यांच्या शेतातील फळबागा तसेच द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भाजीपाला उत्पादक शेतक-यांच्या भाजीपाल्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या शेतातील आंबा वादळी वा-यामुळे झाडला आहे. तर कलिंगड, खरबूज, टमाटे, डाळिंब आधी पिकांचे ही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उमळून पडले आहेत. तर काही ठिकाणी शेतक-यांच्या शेतातील काढून ठेवलेला हरभरा, ज्वारी इत्यादी काढा वरील ताडपत्री उडून गेल्या आहेत. काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले
आहेत. औसा तालुक्यातील वानवडा येथे सिमेंटचा विद्युत पोल मोटरसायकलवर पडल्याने जीवित हानी टळली.
वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्यामुळे दोन तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होत वादळी वा-यासह पडलेल्या पावसाने शेतक-यांना शेतात अनेक अडचणीचा सामना करावा लागला. तर पशुपालक वर्गाची ही मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतक-यांच्या शेतातील गाई, म्हशी, बैल, वासरे यांच्यासाठी केलेले गोठ्यावरील पत्रे उडाल्याचे वृत्त आले आहे. औसा तालुक्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातून औसा तालुक्यात आलेल्या मेंढपाळ समाजांच्या मेंढ्याच्या कळपात असलेल्या शेळया, मेंढ्या, खेचर यांच्यासह मेंढपाळ व्यवसाय करणा-या व्यवसायिकांचीही तारांबळ उडाली आहे. यामुळे दोन तास विद्युत पुरवठा खंडित झाला.
उन्हाची तीव्रता असल्यामुळे नागरिकांना विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे अत्यंत त्रास सहन करण्याची वेळ आली. मागील आठ दिवसापासून औसा तालुक्यामध्ये अधून मधून पडणा-या अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या शेतातील फळबागांचे नुकसान झाले असून कृषी विभाग आणि महसूल विभागाने शेतक-यांच्या शेतातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ही शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.