सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
मंत्रिपद मिळाले नाही तरी मी उदास नाही, साईबाबा माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे आगामी काळात सिंधूरत्न योजनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जोरदार कामाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे ‘ब्रेक के बाद देखो’असा विश्वास माजी मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
दरम्यान, महायुती सरकारमध्ये अनेक विद्यमान मंत्र्यांना डावलून नव्या चेह-यांना संधी देण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना देखील पक्षाने मंत्रिपद नाकारले. शिंदे सरकारमध्ये शिक्षणमंत्री राहिलेल्या दीपक केसरकर यांनी मंत्रिपद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
मला पद मिळाले नसले तरी नितेश राणे यांना मंत्रिपद मिळाले आहे. त्यांच्यासह निलेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात कामाला सुरुवात केली आहे. मला मंत्रिपद न मिळाल्याने नारायण राणे यांना दु:ख झाले. त्यांनी लगेच मला फोन करून काम करत रहा, असा संदेश दिला. त्यामुळे मी यापुढेही काम करत राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मंत्री म्हणून माझी कामगिरी चांगली होती. परफॉर्मन्समध्ये मी एक नंबरला होतो. एकूण मंत्र्यांच्या कामामध्ये माझे काम पहिल्या एक ते चार मंत्र्यांमध्ये होते. पण मला का डावलले हेच मला माहीत नाही. अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, त्यांची मला कीव वाटते. माझं मंत्रिपद देव ठरवत असतो. मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन.
मी साईबाबांचा भक्त आहे. मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत . त्यामुळे जी मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली त्यामुळे मी आनंदात आहे, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले.
आदित्य ठाकरे नासमज आहेत. आदित्य ठाकरे यांच्यामुळेच शिवसेनेत फूट पडली. मुंबई महापालिकेतून पैसा मिळतो त्याला हे लोक खोके म्हणतात. थोडे पैसे इथून-तिथून आले तर त्याला हे मलई म्हणतात. अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे.