पुणे : प्रतिनिधी
बीडमधील प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडची कितीतरी बेहिशेबी संपत्ती आहे. ते बहुधा विरोधी पक्षात नसल्यामुळे त्यांची इडी (सक्तवसुली संचालनालय) चौकशी होत नसावी अशी उपरोधिक शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कराड यांच्या संपत्तीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली. राज्य सरकार हे सरकार आहे की नाराज सरकार आहे? असा प्रश्नही त्यांनी केला.
पक्षाच्या कामासाठी म्हणून डॉ. कोल्हे मंगळवारी सकाळी पुण्यात आले होते. पक्ष कार्यालयात पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्षातील अनेकांची या सरकारने निवडणुकीआधी ईडी चौकशी केली. वाल्मिक कराड यांची केवढी तरी संपत्ती आहे, मात्र त्याकडे सरकारचे लक्ष नाही असे ते म्हणाले. राज्यात बहुमताने सरकार आले, मात्र त्यांच्यात सत्तेवर आल्यापासून फक्त नाराजीच सुरू आहे. मुख्यमंत्रिपद नाही म्हणून नाराज, मंत्रिपद नाही म्हणून नाराज, पालकमंत्रिपद नाही म्हणून नाराज. हे सरकार आहे की नाराज सरकार आहे असा प्रश्न खासदार कोल्हे यांनी केला.
मुख्यमंत्री राज्यात आर्थिक गुंतवणूक व्हावी म्हणून दावोसला गेले आहेत. त्यांनी चांगली गुंतवणूक आणली तर त्याचे स्वागतच आहे, मात्र ही गुंतवणूक फक्त कागदावर रहायला नको, प्रत्यक्षात यायला हवी. बदलापूर येथील अक्षय शिंदे याला पोलिसांनी मारले, ती बोगस चकमक होती असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. आता त्यांनी अशी बनावट चकमक करण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव होता याचाही शोध घ्यावा. मुख्यमंत्री दावोसहून परत आल्यानंतर त्यांना याचा खुलासा विचारावा.