लातूर : प्रतिनिधी
बहूजन समाजातील कष्टकरी महिलांचे प्रश्न राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात आली तरच बहुजन कष्टकरी महिलांच्या प्रश्नांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.
बहुजन महिला हक्क श्रमिक संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर दि. २० सप्टेंबर रोजी बहुजन नारी सन्मान हक्क परिषदेच्या आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी सुषमा अंधारे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संघटनेच्या अध्यक्षा लक्ष्मी कांबळे होत्या. पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, बहुजन महिलांसाठी स्वतंत्र आयोग त्याचबरोबर बहुजन कष्टकरी महिलांच्या पाल्यासाठी शिक्षणाची सोय त्याचबरोबर व्यवसाय कष्टाला दाम या सर्व मागण्यांना आपला पाठींबा राहील व येणा-या काळात मी आपली शिपाई म्हणून काम करेल, अशी ग्वाही देऊन जो पक्ष आपल्या मागण्या मान्य करण्याबद्दल सकारात्मक राहील त्याच पक्षाच्या पाठीमागे आपण राहावे व लक्ष्मी कांबळे यांनीदेखील येणा-या काळात ज्या महिलांनी विश्वास आपल्यावर ठेवलेला आहे त्याला तडा जाऊ नये, अशा प्रकारचे वचन देखील त्यांनी या वेळेला घेतले.
कष्टकरी महिलांच्या मागण्याकडे राजकीय पक्षाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पंधराशे रुपयांनी आपले प्रश्न सुटणार नाहीत, त्यासाठी ठोस असे कार्यक्रम सरकारने राबवणे अपेक्षित आहे. महिलांच्या अंधश्रद्धेवरही बोलताना त्या म्हणाल्या तुम्ही अंधश्रद्धेच्या पोटी पैसे खर्च करण्यापेक्षा स्वत:च्या लेकराच्या शिक्षणावर पैसे खर्च करा. आपली अशीच एकजूट राहिली तर आपले प्रश्न लवकर सुटतील असेही अंधारे म्हणाल्या. लक्ष्मी कांबळे यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन प्रा. विद्या कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला शहर, जिल्ह्यातील बहुसंख्य महिला, पुरुष उपस्थित होते.