लातूर : एजाज शेख
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात सोमवारपासून सुरु झाली. मंगळवारी म्हणजेच स्पर्धेच्या दुस-या दिवशी लातूरच्या नाट्यस्पंदनने अतुल पेठे लिखीत व श्रुतिकांत ठाकुर दिग्दर्शित कसदार अभिनयाने रंगलेली ‘आनंद ओवरी’ने अख्ख सभागृह खिळवून टाकले.
वडिलोपार्जित सावकारीचा वारसा लाभलेला तुकाराम, जमापुंजी इतरांच्या हवाली करुन अध्यात्माच्या मार्गी लागला. घर, संसार सर्व त्यागुन जीवनाचा नवीन मार्ग शोधण्यासाठी द-याखो-यात विसावला. तुकाराम निघून जातो आणि त्याला शोधण्यासाठी त्याचा धाकटा भाऊ कान्होबा विखुरलेल्या कुटूंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो. तुकारामाच्या जीवनातील सर्व गोष्टी, घटनांचा साक्षीदार. त्यामुळे तो तुक्यापासून ते संत तुकारामापर्यंतचा स्मृतीपट सर्वांसमोर मांडतो. तीच ही ‘आनंद ओवरी’.
‘आनंद ओवरी’चे दिग्दर्शक श्रुतिकांत ठाकुर यांनी नाटक उभं करताना संहितेला आवश्यक असणा-या सर्वच गोष्टींचा अगदी बारकाईने विचार करुन मांडणी केली. कल्पकतेने उभारलेले नेपथ्य नाटकाला वेगळी उंची देणारे ठरले. संजय अचाचित व बळवंत देशपांडे यांची प्रकाशयोजना उत्तमच होती. परंपरेचे भान जपणारी भारत थोरात यांची रंगभूषा आणि मुग्धा पोतदार यांची वेशभूषा होती. कान्होबा हे पात्र साकारणाने डॉ. मिलींद पोतदार यांनी सहज सुंदर अभिनय केला. त्यांनी कान्होबाच्या माध्यमातून जसाच्या तसा तुकाराम रंगमंचावर उभा केला. कान्होबा सर्व नाटक उभा करीत असताना तो मात्र न दिसता तुकारामच सर्वत्र दिसत राहातो. देहबोली, संवाद, रंगमंचावरील वावर या सर्व गोष्टी नाट्यरसिकांना खिळवून ठेवणा-या ठरल्या. भाग्यश्री कुलकर्णी (कान्होबाची बायको), अनघा राजपूत (आवली), किरण तोडकरी (वेडा), श्रीराम पाटील, विहान मजगे यांनी आपापल्या भूमिका चांगल्या प्रकारे
साकारल्या.