29 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeसंपादकीय विशेषकाँग्रेस : नाबाद १३८

काँग्रेस : नाबाद १३८

डिसेंबर २०२३ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १३८ वर्षांची होत आहे. माणसाचे आयुष्य जास्तीत जास्त १०० वर्षांचे झाले तर तो मनुष्य खूप जगला असे मानले जाते, राजकीय पक्षांना हा नियम लागू नाही. काँग्रेसला तर अजिबातच नाही. काँग्रेस पक्षाचे राज्य देशात आहे का? किंवा किती राज्यांत आहे… हा हिशेब काँग्रेससाठी लागू नाही. ‘राजकीय पक्ष’ आणि ‘राजकीय सत्ता’ या दोन भिन्न गोष्टी आहेत. मुळात काँग्रेस हा ‘पक्ष’ आहे, असे मानू नका. काँग्रेस या नावात एक ‘विचार’ आहे. भारत हा खंडप्राय देश आहे. तिथे एका धर्माचे लोक राहत नाहीत. अनेक धर्म, अनेक जाती, अनेक पोटजाती, ब-याच प्रमाणात अंधश्रद्धा, रूढी, जादूटोणा, अशांवर विश्वास असलेले कोट्यवधी लोक इथे राहात होते, आणि अजूनही काही प्रमाणात आहेतच. जाती आणि पोटजातीला तर हिशेबच नाही. आताच्या महाराष्ट्राच्या राजकारणात जातीचा विचार केला तर आता इथून पुढे जाती अधिक घट्ट होणार आहेत. आणि ‘विविधतेतील एकते’वरचे सगळ्यात मोठे संकट हेच आहे. काँग्रेस हा पक्ष कधीच नव्हता. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा तो विचार होता. सत्य-अहिंसा, सदाचार ही काँग्रेसची शस्त्रे होती. टिळकांपासून विचार केला तर काँग्रेसमध्ये त्यावेळीही मतभिन्नता होती. आजही मोठ्या प्रमाणात आहे. पण, ‘काँग्रेसचा विचार हा राष्ट्रीय विचार’ आहे. देशाला एकत्र ठेवण्याचा विचार आहे. सर्व जाती-धर्माच्या समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्याचा विचार आहे. स्वातंत्र्यानंतर या देशाची जी काही बांधणी झाली ती काँग्रेसच्या विचारपूर्वक आखलेल्या ध्येयधोरणातून झालेली आहे.

स्वातंत्र्याच्यावेळी देशावर आलेल्या संकटांचा मुकाबला करताना, खंडप्राय देशाच्या आकाराचा विचार करताना, इथल्या जाती-धर्मातील अंधश्रद्धा आणि रूढींचा विचार करताना, राजकीय आणि सामाजिक आघाडीवर काँग्रेसने या देशातील ‘विविधतेमधील एकता’ जपली आणि वाढवली, हे कोणालाही अमान्य करता येणार नाही. त्यामुळे काँग्रेस हा एक विचार आहे. तो गावागावांत आहे. खेड्यापाड्यांत आहे. काँग्रेसचा विचार, काँग्रेसचा झेंडा हा खेड्यापाड्यांत इतक्या खोलवर रुजलेला आहे, तो विचार कोणालाही मारता येणार नाही. महात्मा गांधी यांचा खून करून गांधीजींना मारता आलेले नाही. त्यांचा विचार जगाने स्वीकारलेला आहे. त्याचप्रमाणे ‘सत्ता हातातून गेली म्हणजे, काँग्रेस संपली,’ हा विचारच मुळात कोत्या स्वरूपाचा आहे. राजकीदृष्ट्या निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली असेल.. राजकारणात विजय-पराजय असू शकतो. त्यामुळे सत्ता येईल किंवा जाईल… पण, काँग्रेसचा मूलभूत विचार सर्व काळात देशाला पुढे घेऊन जाणारा आहे. जी घटना डॉ. बाबासाहेबांनी लिहिली… जी घटना काँग्रेसने आणि देशाने स्वीकारली… त्याच घटनेनुसार कोणत्याही एका धर्माचे वर्चस्व या देशात अपेक्षित नाही. ‘सर्व धर्म समान’ अशी या देशाची नैतिक बैठक आहे. काँग्रेसने हा विचार स्वीकारला आणि जोपासला. घटनेने हा विचार मान्य केला आणि ती घटना सरकारने स्वीकारली. त्या घटनेच्या विरोधातील आजचा धार्मिक उन्माद किंवा देव-धर्माच्या नावाने वातावरण तयार करून निर्माण केलेला हा उग्रवाद देशाला विनाशाकडेच घेऊन जाईल. जगातील सगळ्यात मोठ्या देशाची लोकशाही, ती आदर्श व्यवस्था काँग्रेसने जपली आणि वाढवली.

या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झालेला जवळपास ६० वर्षांचा संग्राम, हा जगातील कोणत्याही संग्रामापेक्षा सर्वश्रेष्ठ शांततामय मार्गाचा संग्राम होता. जगाच्या पाठीवर अवघ्या ‘दोन शब्दांनी’ देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा जागात कोणताही देश नाही. हे दोन शब्द म्हणजे ‘चले जाव’, ‘जय हिंद’ स्वातंत्र्याचा महामंत्र होता… त्याच्या जोडीला सेवा, त्याग आणि समर्पण हे आदर्श होते. देशात संवादाची साधने नसताना, आजच्याइतका देश आधुनिक साधनांनी सज्ज नसतानाही, स्वातंत्र्यासाठी कसा लढला जे हे खेड्यातील शेवटच्या माणसांना समजले. स्वातंत्र्यासाठी भारलेल्या वातावरणाचा तो परिणाम होता. काही क्रांतिवीरांनी बलिदान केले. अनेकांनी सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न केला. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव शहीद झाले. ते सर्व मार्ग अवलंबल्यानंतरही शेवटी ‘चले-जाव’या मंत्रात केवढे मोठे सामर्थ्य आहे. आणि ते स्वातंत्र्य मिळवण्याकरिता काँग्रेसने काय केले, याची जाहिरात करण्याची गरज नाही. काँग्रेसशिवाय बाकी कोणी काय केले, याचा हिशेब विचारता येईल. ज्या गांधी-नेहरू घराण्याला आज इतिहासातून नामशेष करण्याची स्पर्धा लागलेली आहे त्या गांधी-नेहरू घराण्याने स्वातंत्र्यासाठी देशाच्या विविध तुरुंगांमध्ये किती वर्षे कारावास भोगला… हे सगळा देश आणि जग जाणते. स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी भागच घेतला नाही, त्यांना असे वाटले होते की, गांधींना मारल्यावर गांधी संपतील. पण, गांधींच्या शरीराला नामशेष केले तरी गांधीविचार नामशेष झाला नाही. आणि काँग्रेसचा सर्वधर्मसमभाव मूलभूत विचार किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पंडित नेहरू यांचे तटस्थतेचे धोरण हा विचारही कोणाला बदलता आलेला नाही.

त्यामुळे लोकशाहीच्या परिभाषेत काँग्रेस आज अनेक ठिकाणी बहुमतात नसली तरी काँग्रेसचा मूळ विचार अल्पमतात कधीही जाऊ शकणार नाही. म्हणून १३८ वर्षांनंतर आज सत्तेत बसलेल्या राजकीय पक्षाला त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू काँग्रेस हाच पक्ष वाटतोय… अजूनही गांधी-नेहरू आणि काँग्रेस यांचा विचार कधी एकदा संपवून टाकतो, अशा हातघाईला अनेक नेते आलेले आहेत. त्यांचा तात्पुरता विजय होत आहे. निवडणुकीत सत्ता मिळवली जात आहे. पण त्यांच्या विजयाला तात्विक आणि सामाजिक समतेची बैठक कुठेही नाही. धार्मिक उन्मादाचा फायदा घेऊन आज मिळवलेले विजय गोड वाटत असले तरी देशात सगळेच काही विचित्र चाललेले आहे. देशातील सगळी वृत्तपत्रेही एकांगी झाली आहेत. आणि ज्या विज्ञानाच्या जोरावर आधुनिक समाजमाध्यमांचा बोलबाला झाला आहे, ती समाजमाध्यमे आज सत्ताधा-यांच्या चरणावर वाहिलेली आहेत. त्यामुळे घटनेची शपथ घेऊन सत्तेवर बसलेले, आज घटनेची पायमल्ली करतात. लोकशाहीतून मिळालेले बहुमत हुकूमशाहीकडे चालले आहे. धर्मवादाचे उदात्तीकरण होऊ लागले. संसदेच्या नवीन वास्तूचे लोकार्पण करताना देशाच्या राष्ट्रपतींनाही आमंत्रण न देण्याचा मुजोरपणा केला गेला. होम-हवन चालू झाले. धार्मिक वातावरणाचा आधार घेऊन लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वाचे उल्लंघन झाले.

एक घटना नेहमी लक्षात ठेवा… या देशाचे राष्ट्रपती महान शास्त्रज्ञ ए. पी. जे. अब्दुल कलाम हे होते. त्यांचा धर्म मुस्लिम आहे. राष्ट्रपती म्हणून ते कलामसाहेब पंतप्रधानपदाची शपथ कोणाला देत आहेत…? तर अर्थतज्ज्ञ असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांना. ते शीख धर्माचे आहेत. आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. आणि त्या मूळच्या ख्रिश्चन आहेत. जगात हे असे कुठेही घडणार नाही. काँग्रेस संस्कृतीचा अर्थच हा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीतही काश्मिरी ब्राह्मण असलेल्या पंडित नेहरू यांनी मुस्लिम असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद यांचा हात हातात धरलेला होता. आणि आझाद यांचा हात कपाळाला उभे गंध लावणारे कट्टर हिंदू मदनमोहन मालवीय यांनी धरला होता. आणि मदनमोहन यांचा हात धर्माने पारशी असलेल्या वीर नरिमन यांच्या हातात होता. देशाचे नेतृत्व त्याचवेळी होऊ शकते… जेव्हा सर्वधर्म समभावाची समर्पणाने जपणूक होते. आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणूक जवळ आल्यावर आठवण होऊन… ‘राखी पौर्णिमेला मुस्लिम भगिनींना राखी बांधा…. ’ हा संदेश भाजपा कार्यकर्त्यांना द्यावा लागला. हा भाजपाचा वैचारिक पराभव आहे. आणि काँग्रेसच्या मूळ तत्त्वाचा तो विजय आहे.

-मधुकर भावे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR