मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसकडून राज्यात संविधान बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. २९ एप्रिल रोजी नाशिक येथे सद्भावना यात्रेचे आयोजन केले आहे. दादरमधील बैठकीत हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली.
काँग्रेसकडून राज्यात संविधान बचाव यात्रा काढण्यात येणार आहेत. २९ एप्रिल रोजी नाशिक येथे सद्भावना यात्रेचे आयोजन केले आहे. तर १ मे रोजी सद्भावना सत्याग्रह तर ४ व ५ मे रोजी परभणी येथे सद्भावना यात्रा व संविधान बचाव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
दादर येथील टिळक भवन येथे हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, उहउ सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार तारिक अन्वर, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव कुणाल चौधरी, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, आ. प्रज्ञा सावत, आमिर शेख, प्रशासन अॅड. गणेश पाटील उपस्थित होते.
माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने २०२५ हे वर्ष संघटन वर्ष घोषित केले आहे. संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. जिल्हाध्यक्षांनी महिन्यातून किमान १० पूर्ण दिवस वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये फिरावे, पक्षाने दिलेल्या आंदोलनात्मक कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी. जिल्हा काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी व्हावे. नेमून दिलेल्या जिल्ह्यात महिन्यातून किमान ६ पूर्ण दिवस दौरे करावेत, दोन दिवस प्रदेश कार्यालयाने दिलेली जबाबदारी पूर्ण करावी. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला कार्यालयाला अहवाल सादर करावा. ३ बैठकांना सलग गैरहजर राहिल्यास त्या पदाधिका-याला कार्यमुक्त केले जाईल, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.
बैठकीत ठराव मांडण्यात आले. त्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली, वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात हिंदी भाषेची सक्ती करण्यास सर्व स्तरांतून विरोध होत आहे. त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेले आहे. सरकारने भाषा समितीशी देखील चर्चा केलेली नाही. त्यामुळे या समितीनेही हिंदी भाषा सक्तीला विरोध केला, त्याचे स्वागत करण्यात आले. राज्यात हिंदी भाषेची सक्ती करू नये, असा ठराव या बैठकीत मांडण्यात आला. राज्य आणि देशातील सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम सत्ताधारी पक्षाशी संबंधित काही लोक करत आहेत. रामदेव बाबांनी ‘सरबत जिहाद’ आणला. त्याच्या निषेधाचा ठरावही मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, मात्र सरकारी भरती करताना मराष्ट्रातील तरुणांना डावलले जात आहे. आयकर विभागाच्या भरतीमध्ये महाराष्ट्रातील फक्त ३ मुलांची निवड झाली तर बहुसंख्य इतर राज्यातील आहेत. मुलाखत घेण्या-यांमध्ये गुजरातमधील अधिकारी होते. भाजपने महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला आहे हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असेही ते म्हणाले.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, काँग्रेसने थोपटे घराण्याला ४० वर्षे आमदारकी दिली, मंत्रिपदे दिली, संग्राम थोटपे यांनाही चारवेळा आमदारकी दिली आहे. असे असतानाही पक्षावर आरोप करणे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी केला. तसेच त्यांच्या कारखान्याचे काही काम असावे, त्यासाठी त्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला असावा असे वाटते, असा टोला त्यांनी थोपटे यांना लगावला.