मुंबई : काँग्रेस पक्षाने ७५ वर्षात काय दिले असा प्रश्न काही लोक विचारत असतात. काँग्रेस पक्षाने रोजगार दिला, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, औद्योगीकरण, तंत्रज्ञानासह चौफेर विकास केला. काँग्रेसने ७५ वर्षात केलेल्या कामांचा हिशोब लिहिण्यास बसलो तर कागद संपतो पण भाजपाने काय दिले याचा हिशोब केला तर फक्त खोटारडेपणा व चॉकलेटच दिले, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की देशाच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान आहे ते कोणीही नाकारू शकत नाही. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंत विकासाची शिखरे काँग्रेस सरकारने गाठली. पण २०१४ पासून सत्तेत आलेल्या भाजपाने काय दिले, तर फक्त खोटी आश्वासने दिली. नोटबंदी केली पण काळा पैसा बाहेर आला नाही, अतिरेकी कारवाया थांबल्या नाहीत फक्त सर्वसामान्य जनतेला त्रास झाला. दरवर्षी २ कोटी नोक-या, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार हे सर्व हवेतच विरून गेले.
नरेंद्र मोदींच्या राजवटीत अदानी व अंबानी तुपाशी आणि जनता मात्र उपाशी अशी परिस्थिती आहे अशी टीका सपकाळ यांनी केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे जाणते नेतृत्व आहेत, त्यांनी राज्याच्या विकासासाठी, समाजकारणासाठी आपली हयात खर्ची घातली, वैचारिक मतभेद असू शकतात पण आज सत्ताधारी पक्ष त्यांना त्रास देत आहे, ते अशोभनीय आहे. शरद पवार यांचा पक्ष फोडला, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला. पूर्वी पोरं चोरणारी टोळी होती आता भाजपा हा पक्ष फोडणारी टोळी बनली आहे, याचा धिक्कार करतो असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सावकारांचे राज्य नको, जनतेचे राज्य हवे
काँग्रेस पक्षाने भोकरला खूप काही दिले. आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण भोकरला आल्यावर मात्र… नाम बडे और दर्शन खोटे, अशी परिस्थिती होती, अशा लोकांचा इतिहास विसरू नका. भोकरचे ते डरपोक लोक मोदींच्या कळपात जाऊन बसले, ‘जो डर गया ओ मर गया’, त्यांनी गद्दारी केली, पळून गेले आता शेठ, सावकारांचे राज्य नको, जनतेचे राज्य हवे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

