नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिकच्या येवला बाजार समितीत छावा शेतकरी संघटना आणि शेतक-यांनी लिलाव बंद पाडले. मनमाड-येवला मार्गावर शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
कांद्यावरील २० टक्के शुल्क रद्द करावे, शेतक-यांना २५ रुपये किलो अनुदान मिळावे, नाफेड आणि एनएफसीसीने प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून अधिका-यांनी कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. या सर्व मागण्यांसाठी शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कांदा उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कांद्याला प्रति क्विंटल अनुदान द्यावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतक-यांनी केली आहे. कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क देखील तातडीने हटवावे, अशी मागणी करत शेतकरी आक्रमक झाले आहेत.
मागील १० दिवसांत क्विंटलमागे जवळपास २ हजार रुपयांनी भाव घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला
क्विंटलमागे सरासरी १८०० ते दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारात लाल कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. कांद्याचे भाव गडगडल्याने, आहे त्या भावात उत्पादन खर्चदेखील वसूल होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तर दुसरीकडे सोलापूरमध्ये देखील माथाडी कामगार आक्रमक झाले आहेत. सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती सलग चार दिवस बंद राहणार आहे. मागच्या दोन दिवसांपासून माथाडी कामगारांनी बंद पुकारला होता. मात्र जवळपास ४० हजार क्विंटल कांदा मार्केटमध्ये पडून असल्याने आज बाजार समितीने अधिकृत सुटी जाहीर केली आहे.
तर उद्या रविवार साप्ताहिक सुटी असल्याने बाजार समिती सलग चार दिवस बंद राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे बंद पुकारण्यात आला आहे. बाजार समिती जरी बंद असली तरी आज कांद्याचे लिलाव पार पडणार आहेत. महाराष्ट्रातील कांद्यासाठीची अग्रगण्य बाजारपेठ म्हणून सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीकडे पहिले जाते. त्यामुळे येत्या सोमवारी तरी माथाडी कामगार माघार घेऊन बाजार समिती सुरू करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.