मुंबई : प्रतिनिधी
‘छावा’ चित्रपटानंतर लोकांच्या भावना प्रज्ज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाविरोधातील लोकांचा राग समोर आला आहे. लोकांनी संयम ठेवला पाहिजे. पोलिसांवर हल्ला करणा-यांना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूरमध्ये एका डीसीपीवर कु-हाडीने हल्ला झाला आहे. राड्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत पाच गुन्हे दाखल झाले आहेत. ११ पोलिस ठाण्यांतर्गत संचारबंदी लागू केली आहे. ट्रॉली भरून दगड मिळाले आहेत. दंगल, हिंसाचार नियोजित पद्धतीने करण्यात आला आहे. दंगल करण्याचा प्रयत्न करणारांची जात आणि धर्म न पाहता कारवाई होईल. कायदा हातात घेणा-यांची गय केली जाणार नाही.
सभागृहात मुख्यमंत्र्यांनी काय दिले निवेदन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूरमध्ये दोन गटांत हाणामारी झाली. पोलिसांनी त्याठिकाणी बळाचा वापर केला. यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर तक्रार द्यायची आहे, अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेश पेठ पोलिस ठाण्यामध्ये बोलावण्यात आले होते. त्यांची तक्रार घेण्यात आली. एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे २०० ते ३०० लोक हातात काठ्या घेऊन आले. त्यांनी तोंडावर कापड बांधले होते. १२ वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेमध्ये काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे.
काही लोकांनी शस्त्रे जमा केली होती-
तिसरी घटना भासदार पूर्व भागात सायंकाळी साडेसात वाजता घडली. ८० ते १०० लोकांचा जमाव होता. तिथे जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे अश्रुधुराचा वापर करावा लागला. या संपूर्ण घटनेमध्ये ३३ पोलिस जखमी झाले आहेत. यात तीन उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत. एका पोलिस उपायुक्तांवर हल्ला करण्यात आला आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एन्ट्री पॉईंटवर नाकाबंदी करण्यात आली आहे. पूर्णपणे शांतता असताना काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केला. काही लोकांनी शस्त्रं जमा करून ठेवली होती, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.