अयोध्येत नव्या मंदिरात श्रीरामाची प्रतिष्ठापना हा कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नपूर्तीचाच सोहळा होता व तो सोमवारी तेवढ्याच दणक्यात साजरा होणे अत्यंत स्वाभाविकच! भारताच्या इतिहासातील एका प्रदीर्घ, रक्तरंजित, कज्जे दलालीत अडकलेल्या, समाजात दुहीच नव्हे तर शत्रुत्व निर्माण करणा-या एका प्रकरणाचा सुखद समारोप झाला व संपूर्ण देशाने न्यायोचित पद्धतीने मोठ्या मनाने तो स्वीकारला ही खरोखरच अत्यंत समाधानाची बाब! सर्वोच्च न्यायालयाने या विवादाचा निवाडा केला व अल्पसंख्याकांनीही इतिहासाचे ओझे मागे टाकून तो मोठ्या मनाने स्वीकारला. या विवादाच्या सर्व कटू इतिहासावर मात करून मोदी यांनी देशातील एका मोठ्या जनसमूहाच्या अपेक्षांची, स्वप्नांची पूर्तता केली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. एका अर्थाने अयोध्येत या निमित्ताने एक नवी सुरुवात झाली आहे. स्वतंत्र भारतात एक उत्तम व निष्पक्ष न्यायव्यवस्था उभी राहिली आहे. त्यामुळे देशातल्या कुठल्याच विवादाने आता समाजात दुही वा शत्रुत्व निर्माण करण्याचे टोक गाठण्याची अजिबात गरज नाही. न्यायसंस्थेच्या निष्पक्षतेवर विश्वास ठेवून सर्वांनीच निवाडा मनापासून स्वीकारायला हवा व त्याची अंमलबजावणीही करायला हवी.
मोदी सरकारने राम मंदिरातील श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा भाजपसाठी राजकीयदृष्ट्या फायद्याचा ठरण्याची काटेकोर काळजी घेतली असली तरी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याची ती अंमलबजावणीच आहे, हे वास्तव विसरता कामा नयेच! आता हेच निकष देशातील इतर विवादांमध्येही पाळण्याचा संयम सर्वांनीच दाखवायला हवा व कुठल्याही विवादाच्या परिणामी देशात दुही वा शत्रुत्व निर्माण होणार नाही, हिंसाचार होणार नाही, धार्मिक विद्वेष वाढणार नाही याची दक्षता घ्यायला हवी! या सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कालचक्र बदलणार असल्याची ग्वाही दिली. ती खरी ठरायची, ख-या अर्थाने देशात रामराज्य अवतरायचे तर रामराज्याप्रमाणेच देशाची व्यवस्था ही न्यायोचित बनवायला हवी. राज्यकर्ते म्हणून मोदी सरकारवरच त्याची सर्वांत जास्त जबाबदारी येते. त्यामुळे सरकारने आपली जबाबदारी यथायोग्य पार पाडली तर देशाचे कालचक्र नक्कीच बदलेल! मात्र, राममंदिर हा सत्ताकारणाचा मुद्दा बनविणा-या भाजपकडून ही जबाबदारी खरोखर पार पाडली जाणार का? याची देशाला प्रतीक्षाच करावी लागणार आहे. तूर्त भाजप सरकारने या सोहळ्याद्वारे आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ दणक्यात फोडला आहे.
हा सोहळा प्रचाराच्या अखेरपर्यंत गाजत राहील यात काहीच शंका नाही! मात्र, रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्याच्या निमित्ताने केलेली भाषणे अराजकीय राहतील व उन्मादी वातावरण निर्मितीला चाप लावणारी असतील याची काटेकोर दक्षता घेतली, हे नक्कीच स्वागतार्ह आहे! या दोघांनीही आपल्या भाषणातून ‘अयोध्येतील राममंदिर’ हा राजकारणाच्या पलीकडचा व राष्ट्र चेतनेचा विषय असल्याचे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मंदिरनिर्मिती ही राष्ट्रउभारणीची प्रेरणा ठरावी, हीच अपेक्षा दोघांनीही व्यक्त केली. सर्वपक्षीय राजकारण्यांनीही हे आता समजून घ्यायला हवे. राजकारण जाती-धर्माच्या नव्हे तर विकासाच्या मुद्यावर व्हायला हवे. हे सर्वांनी पक्के लक्षात ठेवले तर पंतप्रधानांनी या निमित्ताने देशवासीयांना दाखविलेले नवनिर्माणाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल! कारण मंदिराची उभारणी होऊन रामलल्ला त्यात विराजमान झाले असले तरी देशासमोरील गरिबी, बेरोजगारी, शेतक-यांची बिकट स्थिती, आरोग्याचे, शिक्षणाचे, रोटी-कपडा-मकानचे प्रश्न, उपासमारी, भूकबळी,
भ्रष्टाचार वगैरे असंख्य प्रश्न कायमच राहणार आहेत. ते दूर करून रामराज्य निर्मिती करत समाजातील शेवटचा घटक सुखी-समाधानी करण्यासाठी रामलल्लांची प्रेरणा घेऊन, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, त्यांची तत्त्वे, न्यायप्रियता लक्षात ठेवून देशासमोरील सर्व प्रश्नांना भिडायला हवे. ही फक्त राज्यकर्त्यांचीच जबाबदारी नाही. प्रत्येकाने ही स्वत:ची जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन या सामूहिक जबाबदारीतला आपला खारीचा वाटा उचलायला हवा तरच देशाच्या नवनिर्माणाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल! मोदींनी आपल्या भाषणात देशवासीयांना त्याची जाणीव करून दिलेली आहेच. राममंदिरापासून राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा घेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करून त्यांनी राममंदिरानंतर पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. मंदिराच्या पुढे जाऊन आपल्याला देशाच्या भविष्याचा विचार करायला हवा. त्यासाठी सांस्कृतिक वारशाची आधुनिकता व वैज्ञानिकतेशी सांगड घालणे गरजेचे आहे, हेच अधोरेखित करण्याचा प्रयत्न मोदींनी देशातील तरुणांना राष्ट्रनिर्माणाचे आवाहन करताना केला. हे नक्कीच स्वागतार्ह आहे.
मात्र, ते केवळ भाषणापुरते मर्यादित राहता कामा नये, ही सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांचीच प्रमुख जबाबदारी आहे. त्यांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे स्वीकारली तर त्याला देशातून नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळेल व राष्ट्राच्या नवनिर्मितीला नक्की चालना मिळेल यात कुठली शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही. नरेंद्र मोदी व सरसंघचालक मोहन भागवत यांनी या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने केलेली भाषणे ही एका अर्थाने भाजप कार्यकर्त्यांची शिकवणी घेणारी व त्यांना नवे धडे शिकवणारीच होती. ‘जितं मया’चा अभिनिवेश न व्यक्त करता या दोघांनीही भाजप कार्यकर्त्यांसह बहुसंख्य म्हणवल्या जाणा-या सर्वांना जबाबदारीची व कर्तव्याची जाणीव करून देणे, हा खरोखरच एक सुखद धक्का आहे! सर्वत्र ‘जोश’ असताना ‘होश’ असणेही आवश्यक असल्याने आपण ते काम करीत असल्याचे आवर्जून नमूद करताना मोहन भागवत यांनी आता कलह नको, परस्परांमध्ये संघर्षही नकोत, आता नवीन भारताकडे वाटचाल करूया, असे आवाहन करताना देशातील धर्मांतर्गत कलहांवर बोट ठेवले आहे.
त्यांचे हे आवाहन सुखद धक्काच आणि कालचक्र खरोखरच बदलण्याच्या आशा पल्लवित करणारेच. त्यामुळे त्याचे स्वागतच करायला हवे. पंतप्रधानांनीही राजकीय भाषणाचा मोह बाजूला सारून राष्ट्राच्या नवनिर्मितीचा संकल्प केला, त्याचेही स्वागतच! हा संकल्प प्रत्यक्षात उतरावा, निवडणूक प्रचारापुरता मर्यादित राहू नये, हीच अपेक्षा! तसे घडले तरच ख-या अर्थाने देशाचे कालचक्र बदलेल व राष्ट्र नवनिर्माणाचा संकल्प प्रत्यक्षात उतरेल! देश घडविण्यासाठी इतिहासातून, संस्कृतीपासून प्रेरणा घेऊन त्याची वर्तमानाशी योग्य सांगड घालायची असते. केवळ इतिहासात गुरफटून राहणा-या देशाचे वर्तमान व भविष्य कधीच सुधारत नाही. हे पक्के स्मरणात ठेवले तर राममंदिर राष्ट्र नवनिर्मितीची प्रेरणा, ऊर्जा नक्कीच ठरेल. अन्यथा ते एक धार्मिक पर्यटनस्थळ एवढ्यापुरतेच मर्यादित राहील. कदाचित हे धार्मिक पर्यटन देशाच्या अर्थकारणात मोठी भर घालेलही पण त्यामुळे देशाच्या नवनिर्माणाचे लक्ष्य पूर्ण होऊ शकत नाहीच! मोदींनी आपल्या भाषणातून अलंकारिक भाषेचा वापर करत याची जाणीव तमाम रामभक्तांना करून दिलीच आहे. त्यामुळे राम मंदिर हे राष्ट्र मंदिर उभारण्याचे प्रेरणास्रोत बनविण्याची व देशाचे कालचक्र बदलण्याची जबाबदारी सर्व रामभक्तांच्या शिरावर आहे, हे मात्र निश्चित!