22.9 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeलातूरकाव्यातून राष्ट्रीय अस्मिता पेरण्याचे कार्य कुसुमाग्रज यांनी केले

काव्यातून राष्ट्रीय अस्मिता पेरण्याचे कार्य कुसुमाग्रज यांनी केले

लातूर : प्रतिनिधी
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विशाखा या  कवितासंग्रहातील गर्जा जय जयकार, पृथ्वीचे प्रेमगीत, कोलंबसाचे गर्वगीत, लिलाव, आव्हान आदी विविध कवितांचा उल्लेख करुन त्या कवितांमधून राष्ट्रीय अस्मिता कशी जागृत करण्यात आली आहे  त्याग, समर्पण,  आशावाद, प्रेम कर्तव्यनिष्ठा,  राष्ट्रभक्तीची भावना या कवितेतून कवीने कशा प्रकारे मांडल्या आहेत,  त्यासाठी प्रकाश, सूर्य, सागर, वादळ, मशाल, दीप अशी विविध  प्रतिके वापरुन आपल्या कवितेत कुसुमाग्रज यांनी राष्ट्रीय अस्मिता तेवत ठेवण्याचे मौलिक कार्य केले आहे, असे प्रतिपादन डॉ. सुरेखा बनकर यांनी केले.
‘मराठी भाषा गौरव दिन’ निमित्त येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख महिला महाविद्यालयात मराठी भाषा  विभागातर्फे आयोजित  व्याख्यानात  डॉ. सुरेखा बनकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आशा मुंडे होत्या. आपल्या व्याख्यानात पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,  आजची आव्हाने वेगळी आहेत. राष्ट्राला मिळालेले स्वातंत्र्य टिकविणे,  भेदभाव जातीयवाद दूर करणं, पर्यावरण रक्षण, स्त्रियांचा सन्मान, नितीमुल्यांचे पालन, आरोग्यदायी समाजजीवन, रक्षण इत्यादी कर्तव्य करुनही आपण राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय अस्मितेची जोपासना करु शकतो. त्यासाठी हातात शस्त्र घेऊन लढायला जाण्याचीच आवश्यकता नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले कर्तव्य,  संस्कृती, संस्कार यांची जाणीव ठेऊन स्वत:मध्ये राष्ट्रभक्तीची मशाल सतत तेवत ठेवली पाहिजे असे विवेचन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. आशा मुंडे यांनी मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी, नाटककार, कादंबरीकार कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्यामधील योगदानामुळे त्यांचा  जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन  म्हणून मोठया उत्सहात साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी विपुल प्रमाणात काव्य निर्मिती केली असून त्यामध्ये सामान्य व्यक्तीला, तरुणाना त्यांच्यात  आत्मचेतना निर्माण होऊन सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून समाज विधायक कार्य केले पाहिजे असा जणू संदेश दिला आहे. तसेच, मराठी भाषामधील बोली भाषा, प्रमाण भाषा, मराठवाडी बोली, कोकणी बोली, अहिराणी बोलीभाषेतील विविध संदर्भ देऊन समाजातील भाषेची उपयुक्ततता, मौलिकता याविषयी मौलिक मार्गदर्शन करताना स्वदेश, स्वसंस्कृती व स्वभाषा यांचा अभिमान ज्या समाजास असतो तो उच्च प्रतीचा समाज असतो, असे मौलिक विचार मांडले. या समारंभाचे प्रास्ताविक डॉ. विद्या कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. संग्राम टेकले यांनी केले. आभार डॉ. बालाजी वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR