पुणे : प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी गेल्या होत्या. सुदैवाने त्या आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित घरी परतल्या आहेत. शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून रुपाली ठोंबरे आणि त्यांच्या कुटुंबाचे पुणे विमानतळावर स्वागत केले.
यावेळी सुषमा अंधारे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सुषमा अंधारे या रुपाली ठोंबरे यांच्या गळ्यात पडून रडतानाचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे बुधवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला. ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा रुपाली ठोंबरे आपल्या कुटुंबासोबत जम्मू-काश्मीरमध्येच होत्या. मात्र, आता त्या सुखरूप घरी पोहोचल्या आहेत. दरम्यान, रुपाली ठोंबरे आपल्या कुटुंबासोबत पुणे विमानतळावर पोहोचल्या असता सुषमा अंधारे यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना मिठी मारली. यावेळी सुषमा अंधारे भावूक झाल्या आणि रुपाली ठोंबरे यांच्या गळ्यात पडून रडल्या, ज्याचा व्हीडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.