सध्या क्रीडा जगतात आयसीसीची चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. पाकिस्तान या स्पर्धेचा यजमान देश आहे. सध्या जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पाकिस्तान दारिद्र्य रेषेखाली आहे. एक वेळच्या जेवणालाही हा देश महाग आहे. तब्बल दीड दशकानंतर आयसीसी स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळाल्यामुळे या देशाची आर्थिक भरभराट होईल, अशी आशा निर्माण झाली होती; परंतु या देशाला अतिरेकी कारवाया नडल्या. हिंसक गोष्टींमुळे कोणताही देश पाकिस्तानमध्ये खेळण्यास उत्सुक नव्हता. भारताने तर या देशावर बहिष्कारच टाकला आहे. दोन्ही देशांमधील अहि-नकुल सख्य जगप्रसिद्ध आहे. म्हणून ही स्पर्धा जाहीर झाल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार जाहीर केला. क्रिकेट जगतात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा दबदबा आहे.
भारताकडे ‘सोन्याची कोंबडी’ म्हणून पाहिले जाते. स्पर्धेत भारताचा सहभाग नाही म्हटल्यानंतर प्रेक्षक स्टेडियमकडे पाठ फिरवणार, पर्यायाने स्पर्धा आयोजित करणा-या देशाला आर्थिक फटका अस होणार हे निश्चित होते त्यामुळे भारताने स्पर्धेत सहभागी व्हावे म्हणून मिनतवा-या सुरू झाल्या. अखेर भारताने आपले सामने पाकमध्ये न खेळता दुबईत खेळावेत, असा तोडगा काढण्यात आला. भारतानेही स्पर्धेत खेळण्यास होकार दिला आणि यजमान पाकिस्तानच्या जीवात जीव आला! चॅम्पियन्स स्पर्धेत एकूण ८ देशांचा सहभाग आहे त्यांना २ गटांत विभागण्यात आले आहे. ‘अ’ गटात भारत, पाकिस्तान, न्युझिलंड आणि बांगलादेशाचा समावेश आहे तर ‘ब’ गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे देश आहेत. दुबईत भारताचा बांगलादेश विरुद्ध पहिला सामना झाला आणि त्यात भारताने दणदणीत विजय मिळवला.
भारताचा दुसरा सामना यजमान पाकिस्तानविरुद्ध होता. नेहमीप्रमाणे दोन्ही देशातील ही लढत महामुकाबला म्हणून गणली गेली. भारत-पाक सामना म्हटला की त्यात दोन्ही देशांची इभ्रत, इज्जत पणाला लागलेली असते. दोन्ही देशांचे पाठीराखे आपापल्या संघांना ‘करो या मरो’ असे सुनावत असतात. या स्पर्धेचा चषक आपल्या देशाला मिळो वा न मिळो; परंतु ही लढत जिंकलीच पाहिजे यावर दोन्ही देशांच्या चाहत्यांचा भर असतो. त्याच इर्षेने दोन्ही देशांचे प्रेक्षक तहान-भूक विसरून स्टेडियमकडे धाव घेतात आणि डोळ्यात प्राण आणून सामना पाहतात. आपले इप्सित साध्य झाले की त्या देशाचे पाठीराखे विजयाचा ‘भांगडा’ करतात आणि अपयशी संघाचे पाठीराखे डोक्यात राख घालून घेतात, ओक्साबोक्सी रडतात आणि घरात बसून सामना पाहणा-यांचे दूरदर्शन संच यमसदनाला जातात! २३ फेबु्रवारी रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर असेच काहीसे घडले.
भारत आणि पाकिस्तानमध्ये आणखी एक पारंपरिक लढत झाली आणि नेहमीप्रमाणेच भारताने पाकवर वर्चस्व राखले. गत काही वर्षापासून दोन्ही देशांत बिघडलेल्या राजकीय संबंधामुळे आयसीसी स्पर्धा अथवा आशिया चषकाच्या निमित्तानेच चाहत्यांना या २ संघांतील थरार पहायला मिळतो. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफित पाकिस्तानने अंतिम सामन्यात भारताला नमवले होते त्यामुळे या वेळी भारताला त्या पराभवाचा वचपा काढण्याची उत्तम संधी होती. त्या दृष्टीनेच भारताने या लढतीत खेळ केला. अलिकडे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारताने आपला दबदबा निर्माण केला आहे. भारतीय संघातील तरुणाई चांगलीच बहरली आहे. प्रश्न होता तो रोहित शर्मा आणि विराट कोहली या बुजुर्गांचा. दोघांचेही फॉर्मसाठी ‘ढुंढो ढुंढो रे साजना’ सुरू होते. त्यातही ‘रोहिट’ला फॉर्म गवसला होता. विराटचे मात्र वर्षभरापासून ‘निशाना चूक ना जाये’चे प्रयत्न सुरू होते.
त्याचे या सामन्यात ‘कभी आर-कभी पार’ संपणार काय? हा लाख मोलाचा प्रश्न होता. त्याचे उत्तरही या सामन्यात मिळाले. पाकविरुद्ध विराट उभा राहिला की ‘मुर्देमे भी जान आती है’! असो. पाकचा कर्णधार मोहम्मद रिझवानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. रिझवान डोळे झाकून माळ ओढत पाकसाठी दुवा मागत होता. माळ ओढल्याने दुवा मिळत नसते मिळते ती चौकार, षटकार ओढल्याने; पण हे रिझवानला सांगणार कोण? कदाचित नंतर हे त्याच्या लक्षात आले असेल म्हणूनच त्याने विराटचे पाय धरले होते! बाबर आझम आणि इमाम उल हकने ब-यापैकी सुरुवात केली. बाबर आझमला पाकमध्ये ‘किंग कोहली’ म्हणून ओळखले जाते म्हणे; परंतु अखेर ‘बाप, बाप होता है’ हे विराटची खेळी पाहून त्याच्या लक्षात आले असेल. हार्दिक पांड्याने बाबरचा (२६) काटा काढला आणि पाकला पहिला ‘कांटा लगा’. इमाम एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात ‘बापू’च्या थेट फेकीवर धावबाद झाला. इमाम हा इंझमाम उल हकचा पुतण्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंझमाम हा ३५ वेळा धावबाद झाला आहे!
रिझवान आणि सौद शकीलने तिस-या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरला; परंतु त्यासाठी त्यांनी १४४ चेंडू खाल्ले. इथेच पाकच्या पराभवावर पहिला खिळा ठोकला गेला. रिझवान (४६) आणि सौद शकील (६२) बाद झाल्यानंतर पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली. ४९.४ षटकांत २४१ धावांत पाकचा संघ आडवा झाला. कुलदीपने ३ तर हार्दिकने २ बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना १५ चेंडूत २० धावा काढून रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर गिल-विराटने तिस-या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. रोहितची दांडी उडवणा-या शाहीन आफ्रिदीवर गिलने हल्ला चढवला होता. ४६ धावा काढून गिल बाद झाला तेव्हा भारताची २ बाद १०० अशी स्थिती होती. नंतर कोहली-श्रेयस जोडीने ११४ धावांची भागीदारी करून भारताचा विजय पक्का केला. श्रेयस ५६ धावांवर बाद झाला. विराट शतकाजवळ पोहोचला तेव्हा त्याचे शतक होऊ नये म्हणून शाहीनने ३ वाईड चेंडू टाकले. पाक खेळाडूंची ही रणनिती खिलाडूवृत्तीला साजेशी नव्हती.
अखेर विराटने चौकार ठोकत संघाला विजय मिळवून देताना स्वत:चे शतकही पूर्ण केले. त्याने १११ चेंडूत नाबाद १०० धावा काढल्या. वन डेमधील त्याचे हे ५१ वे तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८२ वे शतक. आजही त्याचा फिटनेस इतका अफलातून आहे की, एकेरी-दुहेरी धावा काढताना तो तरुण खेळाडूंच्या तोंडाला फेस आणतो. नोव्हेंबर २०२३ नंतर विराटने प्रथमच एकदिवसीय शतक ठोकले आहे. त्याने १४ हजार धावांचा विक्रम प्रस्थापित केला आहे. या सामन्यावर ‘सब कुछ विराट’ची छाप होती. ‘किंग विर्राऽऽऽट’ असा गजर केला जातो तो उगाच नाही!