लातूर : प्रतिनिधी
कुसुम अभियानाअंतर्गत उपेक्षित गटांचे १६ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत आशा व पुरुष स्वयंसेवक यांच्या मदतीने प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यात २९१ उपेक्षित ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करुन जवळपास ३३ हजार ९५५ व्यक्तींची शारीरीक तपासणी करण्यात आली आहे. १३ नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांना औषधोपचार देण्यात आले आहेत.
शाश्वत विकास ध्येयाच्या अंतर्गत केंद्र शासनाने सन २०२७ पर्यंत कुष्ठरोग प्रसार उद्दीष्ट निश्चित केले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील सर्व कुष्ठरुग्ण शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व जिल्ह्यामध्ये १६ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत अतिजोखमीच्या भागात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) हे अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये करण्यात आलेल्या तपासणीमध्ये लातूर जिल्ह्यात १३ नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले. या रुग्णांवर मोफत उपचार सुरु करण्यात आले.
नियमित, विशेष सर्वेक्षणामध्ये वंचित राहणा-या, दुर्लक्षित राहणा-या विट भट्टीकामगार, खाण कामगार स्थलांतरीत व्यक्ती, बांधकाम मजूर निवासी, आश्रमशाळेत राहणारे विद्यार्थी, कंपनीत काम करणारे कामगार आदींवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. या गटातील लोक हे कामासाठी, मजुरीकरीता लवकर घर सोडतात व उशिरा घरी परत येतात. यामुळे अशा व्यक्तींची आरोग्य तपासणी नियमीत सर्वेक्षण अथवा कुष्ठरोग शोध मोहिमेमध्ये होत नाही. ही मोहिम लातूर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे व सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. विद्या गुरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.