मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत घेतलेला वादग्रस्त निर्णय कुस्ती पंच नितीश काबलिये यांना भोवला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने त्यांच्यावर ३ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांना राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे.
२ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यासह देशभरातील कुस्तीप्रेमींचे आकर्षण असणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही यंदा अहिल्यानगर येथे खेळवली जात होती. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्या वतीने अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी महाराष्ट्र केसरी या खिताबासाठी स्पर्धेची अंतिम लढत पार पडली मात्र त्यापूर्वी झालेल्या उपान्त्य फेरीत पैलवान शिवराज राक्षेच्या पराभवानंतर स्पर्धेत गोंधळ निर्माण झाला.
अहिल्यानगर येथील महाराष्ट्र केसरी २०२५ च्या गादी विभागातील स्पर्धेची अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. मात्र यावेळी कुस्ती पंच नितीश काबलिये यांनी दिलेल्या एका वादग्रस्त निर्णयामुळे मोठा गोंधळ उडाला. रागाच्या भरात शिवराज राक्षेही आक्रमक झाला आणि त्याने थेट पंचांना मारहाण केली. यामुळे शिवराज राक्षे याला ३ वर्षांसाठी निलंबित सुद्धा करण्यात आले आहे. अहिल्यानगर येथे झालेल्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये पै. पृथ्वीराज मोहोळ व पै. शिवराज राक्षे यांच्या कुस्तीस मुख्य पंच म्हणून काबलिये काम करत होते.
कुस्ती दरम्यान त्यांनी दिलेल्या चितपटच्या निकालावरून प्रचंड गोंधळ झाला. नितीश काबलिये यांनी हा वादग्रस्त निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत एक समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत काबलिये यांना दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे कुस्ती पंच नितीश काबलिये यांना आता तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने नितीश काबलिये यांना पत्र पाठवले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांना तीन वर्षांसाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सहभागास बंदी घालण्यात आली आहे.