टोरॅँटो : कॅनडा सरकारने आता बाहेरच्या देशातून येणा-या नागरिकांसाठी नियमात बदल केले आहेत. याचा परिणाम विद्यार्थी आणि नोकरीसाठी गेलेल्यांवर विशेषत: भारतीयांवर परिणाम होणार आहे. कॅनडाच्या नवीन नियमांनुसार, तेथील सीमा अधिकारी कधीही अभ्यास, काम किंवा पर्यटन व्हिसा घेतलेल्यांचा तात्पुरता निवास व्हिसा रद्द करू शकतात.
नवीन नियमांनुसार, सीमा अधिका-यांचे अधिकार वाढविण्यात आले आहेत. अलिकडेच लागू झालेले नवीन इमिग्रेशन आणि रिफ्यूजी प्रोटेक्शन नियम, सीमा अधिका-यांना इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल अॅथोरायझेशन आणि टेम्पररी रेसिडेंट व्हिसा सारखे तात्पुरते निवासी कागदपत्रे रद्द करण्याचे पूर्वीपेक्षा जास्त अधिकार दिले आहेत.
नवीन नियमांमुळे हजारो परदेशी नागरिकांवर याचा परिणाम होणार आहे. त्यात मोठ्या संख्येने भारतीयांचा समावेश आहे. कॅनडामध्ये शिक्षण घेणे हे अनेक भारतीयांचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय कॅनडामध्ये जात असतात. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कॅनडामध्ये सुमारे ४,२७,००० भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
२०२४ च्या अखेरीस स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम व्हिसा प्रोग्राम रद्द करण्यासह ओटावाच्या इमिग्रेशन फ्रेमवर्कमध्ये अनेक बदल केल्यानंतर सुधारित नियम आले आहेत, असे अहवालात म्हटले आहे. कॅनडामध्ये शिकणा-या ४,२७,००० विद्यार्थ्यांव्यतिरिक्त, दरवर्षी भारतातून लाखो पर्यटक येतात. जानेवारी ते जुलै २०२४ दरम्यान, कॅनडाने भारतीयांना ३,६५,७५० अभ्यागत व्हिसा जारी केले.