लातूर : प्रतिनिधी
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत अवमान केल्याच्या प्रकाराचा गुरुवारी नागपूर विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या आंदोलनात सहभाीग होत अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
‘डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचा आत्मा आहेत, देशाचा विवेक आहेत, त्यांचा अपमान म्हणजे संपूर्ण देशाचा अपमान आहे’, आम्ही तो कदापीही सहन करणार नाहीत, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. संसदीय लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा गैर वापर करुन संसदेतच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जाणिपुर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होईल, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा संपूर्ण देशभर निषेध व्यक्त केला जात असून माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनीही अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.