राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का
गुवाहाटी : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली अखेर केकेआरला यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला विजय साकारता आला. केकेआरच्या क्विंटन डीकॉकच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर केकेआरला राजस्थान रॉयल्सवर मोठा विजय साकारता आला. केकेआरच्या गोलंदाजांनी अचूक कामगिरी निभावली. त्यामुळे राजस्थानच्या संघाला १५१ धावांत रोखता आले. त्यानंतर डीकॉकच्या वादळी खेळीच्या जोरावर केकेआरने ८ विकेट्स राखत मोठा विजय साकारला. डीकॉकने नाबाद ९७ धावा करत विजयात मोठा वाटा उचलला.
अजिंक्यने टॉस जिंकला आणि त्यानंतर त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केकेआरसाठी योग्य ठरल्याचे पाहायला मिळाले. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली, पण संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनाही मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. संजूला यावेळी १३ धावा करता आल्या तर यशस्वीने २९ धावा केल्या. कर्णधार रायन परागकडून यावेळी मोठ्या आशा होत्या, पण त्याला संघाच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. त्याला फक्त २५ धावा करता आल्या. ध्रुव जुरेललाही मैदानात आपली छाप पाडता आली नाही. कारण ३३ धावा करूनही जुरेलच्या बॅटला चेंडू लागत नव्हता. त्याच्यामुळेच राजस्थानला आपली धावसंख्या वाढवण्यात अपयश आले. पण जोफ्रा आर्चरने त्यानंतर आक्रमक फटकेबाजी केली आणि राजस्थानला १५० धावांचा पल्ला गाठता आला. त्याने ७ चेंडूंत दोन षटकारांच्या जोरावर १६ धावा केल्या. राजस्थानच्या १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डीकॉकने केकेआरचा विजय सुकर केला.