विधान परिषद निवडणूक, भाजपचे उमेदवार जाहीर
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विधानपरिषदेच्या ५ रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. यात ३ जागा भाजपला तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. भाजपने तिन्ही जागांवर उमेदवार निश्चित केले असून, त्यामध्ये दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आली. येत्या २७ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपला उमेदवार अद्याप जाहीर केला नाही. परंतु शिवसेना चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी देऊ शकतो तर राष्ट्रवादी उमेश पाटील, झिशान सिद्दिकी किंवा संजय दौंड यापैकी एकाला उमेदवारी देऊ शकते. दरम्यान, माधव भंडारी यांना पुन्हा एकदा हुलकावणी मिळाली आहे.
दरम्यान, भाजपकडून विधानपरिषदेचे तीनही उमेदवार भाजपच्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयात पोचली. या अगोदर माधव भंडारी, अमर राजूरकर, बसवराज पाटील, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांची नावे चर्चेत होती. त्यादृष्टीने हालचालींना वेगही आला होता. परंतु ही नावे बाजूला सारत भाजपने नवे चेहरे दिले आहेत. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (दि. १७) अखेरचा दिवस आहे. त्यामुळे भाजपने आपली तीन नावे निश्चित केली. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाची वर्णी लागते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादीचे उमेदवार ठरेनात
शिवसेना पक्षातील इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षात घेता एकनाथ शिंदे सावध पावले टाकत आहेत. त्यामुळे ऐनवेळी उमेदवाराची घोषणा होऊ शकते. मात्र, यामध्ये चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच शीतल म्हात्रे यांच्याही नावाची चर्चा आहे. तसेच संजय मोरे, किरण पांडव यांच्याही नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीतही झिशान सिद्दिकी, उमेश पाटील, संजय दौंड यांच्या नावाची चर्चा आहे.