वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
खगोलशास्त्रज्ञांनी आता एक धक्कादायक संशोधन केले आहे. पृथ्वीवर पडणा-या सर्वात शक्तिशाली कॉस्मिक किरणांचा उगम आकाशगंगेच्या कोणत्या दूरस्थ कोप-यात नसून, आपल्याच आकाशगंगेतील मोठ्या प्रमाणात असलेल्या डार्क मॅटर या गूढ कणांपासून होऊ शकतो, असे हे नवीन संशोधन सुचवते. हे डार्क मॅटरचे कण आपसात विलीन होऊन अत्यंत उर्जायुक्त किरणोत्सर्ग निर्माण करतात. जर हे संशोधन खरे ठरले, तर या किरणांच्या निमित्ताने डार्क मॅटर या रहस्यमय अवकाशीय पदार्थाच्या अस्तित्वाचीही पुष्टी होऊ शकते.
कॉस्मिक किरणे ही उच्च-ऊर्जायुक्त कणांची सतत वाहणारी प्रवाहिका असते. ती प्रामुख्याने प्रोटॉनपासून बनलेली असतात; परंतु काहीवेळा त्यामध्ये हेलियम किंवा लोखंडासारख्या जड मूलद्रव्यांचे केंद्रक असतात. हे अतिशय वेगवान कण जवळपास प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात आणि त्यांच्याकडे असणारी ऊर्जा आपल्या सर्वात प्रबळ कण प्रवेगकांपेक्षा अब्जावधी पट अधिक असते.
बहुतेक कॉस्मिक किरणांचे स्रोत वैज्ञानिकांना माहीत आहेत. सुपरनोव्हा, तारे एकमेकांमध्ये विलीन होणे, कृष्णविवरांमध्ये पदार्थाचा नाश होणे यांसारख्या शक्तिशाली आकाशीय घटनांमुळे हे किरण तयार होतात; पण सर्वात शक्तिशाली कॉस्मिक किरणांचे नेमके उगमस्थान अद्याप वैज्ञानिकांना पूर्णत: समजलेले नाही. आपल्या सध्याच्या माहितीप्रमाणे शक्तिशाली कॉस्मिक किरणांचे सर्व ज्ञात स्रोत अब्जोवधी प्रकाशवर्षे दूर आहेत. एवढ्या लांबून प्रवास करणा-या कणांची मधल्या माध्यमांमुळे गती कमी व्हायला हवी; पण जर ही किरणे खूप जवळून, आपल्या आकाशगंगेमधूनच निर्माण होत असतील, तर ती ऊर्जा टिकवू शकतात.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या; पण अद्याप समकालीन पुनरावलोकन न झालेल्या एका अभ्यासानुसार हे शक्तिशाली कॉस्मिक किरण एका अत्यंत दुर्मीळ आणि गूढ डार्क मॅटर कणांपासून उत्पन्न होत असावेत. हे गूढ डार्क मॅटर कण ‘स्कॅलेरॉन’ नावाने ओळखले जातात. ते ज्ञात टॉप क्वॉर्कपेक्षाही खूप जड आहेत. हा कण महाविस्फोटानंतर (बिग बँग) लगेच, ‘मिती-विस्तारण’ या काळात निर्माण झाला असावा. जर हे संशोधन सत्य ठरले, तर आपण कॉस्मिक किरणांद्वारे डार्क मॅटरचा प्रत्यक्ष पुरावा मिळवण्याच्या अगदी जवळ असू शकतो. डार्क मॅटर हा विश्वाच्या रचनेतील सर्वांत गूढ घटकांपैकी एक मानला जातो आणि याचा शोध लागल्यास भौतिकशास्त्राच्या मूलभूत समजुतीत मोठी क्रांती होऊ शकते.