कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात भूकंप झालाय, त्याचे हादरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसले आहेत. कागलचे माजी आमदार संजय घाटगे आणि त्यांचा मुलगा अंबरीश घाटगे आज भाजपात प्रवेश करणार आहेत. संजय घाटगे यांच्या जाण्याचा फटका ठाकरेंना बसणार आहे.
ठाकरेंची कोल्हापूरमधील ताकद कमी झाली आहे. घाटगे आज दुपारी कोल्हापूर येथील एका जाहीर सभेत भाजपात प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपासून घाटगे हे भाजपच्या संपर्कात होते. जनता दल, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष व्हाया ठाकरेंची शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत.
संजय घाटगे यांचा स्थानिक राजकारणात चांगलाच दबदबा आहे. त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणूनही काम पाहिले आहे. कागलमधील अनेक सामाजिक आणि सहकारी संस्थांवर त्यांचे वर्चस्व आहे. त्यांचे सुपुत्र अंबरीश घाटगे हेही तरुण नेतृत्व म्हणून कागलमध्ये चर्चेत आहेत. त्यांनी स्थानिक पातळीवर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्याआधी भाजपने एकाचवेळी ठाकरे आणि पवार यांना धक्का दिला आहे. संजय घाटगे ठाकरेंच्या शिवसेनेत होते, आता ते भाजपात जात आहेत. संजय घाटगे यांना ताकद देत फडणवीस यांच्याकडून समरजीत घाटगे यांना धक्का दिला जाईल. विधानसभेच्या तोंडावर समरजीत घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकला होता. आता संजय घाटगे आणि अंबरीश घाटगे यांच्या भाजपा प्रवेशामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता आहे.