विविध देशांचा दौरा करणार भारतीय खासदार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऑपरेशन सिंदूरच्या भारताच्या कारवाईची माहिती जगातील सर्व देशांना देण्यासाठी ७ भारतीय शिष्टमंडळ लवकरच परदेश दौ-यावर रवाना होणार आहेत. यामध्ये भाजप आणि काँग्रेससह अनेक पक्षांचे नेते समाविष्ट आहेत. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या नेत्यांची संपूर्ण यादी जाहीर केली. हे पाऊल दहशतवादाविरुद्ध भारताच्या मजबूत आणि एकत्रित धोरणाचे प्रतिबिंब आहे, ज्या अंतर्गत भारत वेगवेगळ््या देशांमध्ये जाऊन आपली रणनीती आणि कृती स्पष्ट करणार आहे, असे रिजिजूंनी स्पष्ट केले.
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविला आहे. तसेच दहशतवादाविरुद्ध देश कसा एकवटला, याचा संदेश देण्यासाठी मोदी सरकारने खासदारांच्या शिष्टमंडळाचे ७ गट तयार केले असून, हे खासदारांचे गट वेगवेगळ््या देशात जाऊन भारताची दहशतवादाविरुद्धची भूमिका स्पष्ट करणार आहेत. ग्रुप एक सौदी अरेबिया, कुवैत, बहरीन, अल्जिरिया या देशांत जाणार आहे. दुसरा गट इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, युरोपीयन युनियम, इटली, डेन्मार्क या देशांत तिसरा गट इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया प्रजासत्ताक, जपान, सिंगापूरमध्ये, चौथा गट यूएई, लायबेरिया, कॉंगो, सिएरा लिओनला जाणार आहे. पाचवा गट अमेरिका, पनामा, कॅनडा, ब्राझील, कोलंबियाला जाणार आहे. सहावा गट स्लोव्हेनिया, ग्रीस, लॅटेव्हिया, रशियाला तर सातवा गट इजिप्त, कतार, आफ्रिका, द. आफ्रिकेला जाणार आहे. या देशांत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईबद्दल माहिती दिली जाणार आहे.
कॉंग्रेसने सूचविलेली
नावे केंद्राने डावलली
सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळांचे सरकारने ७ गट तयार केले. यासाठी कॉंग्रेस पक्षाने ४ नेत्यांची नावे दिली होती. त्यामध्ये आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार यांचा समावेश होता. परंतु ही नावे डावलून कॉंग्रेस नेते शशी थरूर, सलमान खुर्शिद, मनिष तिवारी, अमर सिंह यांची निवड केली. पक्षाने दिलेल्या एकाही नावाचा विचार न केल्याने कॉंग्रेसने केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली.