25.5 C
Latur
Wednesday, May 28, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरखोतकरचे एन्काऊंटर; मध्यरात्री छ. संभाजीनगरमध्ये थरार

खोतकरचे एन्काऊंटर; मध्यरात्री छ. संभाजीनगरमध्ये थरार

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री थरार घडला. शहराजवळील वडगाव कोल्हाटी या परिसरात पोलिस आणि कथित दरोडेखोरामध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. नुकत्याच उद्योजकाच्या घरावरील दरोड्याप्रकरणात आरोपीचा शोध सुरू होता. तो वडगाव कोल्हाटी परिसरात असल्याचे समजताच पोलिसांचा फौजफाटा तिथे पोहोचला. तेव्हा आरोपीने गोळीबार केला. पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत अमोल खोतकर याचे एन्काऊंटर झाले. या कारवाईत तो जागीच ठार झाला.

छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर नुकताच दरोडा घालण्यात आला होता. ७ मे रोजी ते कुटुंबियांसह अमेरिकेला गेले होते. त्यांचा विश्वासू संजय झळके हा केअरटेकर म्हणून बंगल्यात काम करत होता. १५ मे रोजी रात्री २ ते ४ या दरम्यान ६ दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर या बंगल्यातून साडेपाच किलो सोने आणि ३२ किलो चांदी असा ६ कोटींचा ऐवज लंपास केला होता.

या दरोड्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. वाळूज एमआयडीसी ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. ११ दिवसांपासून गुन्हे शाखेचे ७ आणि एमआयडीसी वाळूज ठाण्यातील २ अशी पथकं तपास करत होती. त्याचवेळी अमोल खोतकर हा कोल्हाटी भागातील कचरापट्टी भागात लपल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले होते. मध्यरात्री त्याला अटक करण्याची तयारी करण्यात आली होती.

या दरोडा प्रकरणात पोलिसांनी तपासाअंती ५ दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर या दरोड्याचा अमोल हा सूत्रधार असल्याचे समोर येत होते. त्याला अटक करण्यासाठी गुप्तता बाळगण्यात आली होती. काल मध्यरात्री पोलिसांनी तो असलेल्या परिसराला गराडा घातला. त्याची चाहूल आरोपीला लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपीने गोळीबार करत पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचे एन्काऊंटर झाल्याचे समोर आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR