घरोघरी जोरदार तयारी, सर्वत्र कडेकोट बंदोबस्त
मुंबई : प्रतिनिधी
सर्व भक्तांच्या लाडक्या गणरायाचे उद्या शनिवारी आगमन होणार आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सार्वजनिक गणेश मंडळासह घरोघरी जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी सजावटही करण्यात आली असून, ठिकठिकाणी अगोदरच रोषणाई करण्यात आल्याने शहरे आधीच उजळून निघाली आहेत. तसेच गणरायाच्या स्वागतासाठी ढोल वादकांनीही जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, विशेषत: मुंबई, पुण्यात विशेष काळजी घेण्यात आली आहे.
७ ते १७ सप्टेंबरदरम्यान १० दिवस सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळणार आहे. गणेशभक्त आता गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून, गणरायाच्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात गणेशभक्त गणरायाचे स्वागत करणार आहेत. तसेच घरोघरीदेखील गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामुळे घरोघरीदेखील नागरिकांनी मूर्ती प्रतिष्ठापनेची तयारी केली असून, आता राज्यात सर्वत्र भाविक भक्त गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
मुंबईत गणेशोत्सव काळात वाहने आणि पादचा-यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. १० दिवस गणेशोत्सवासाठी पोलिसांनी शहरात ५ हजारांहून अधिक पोलिस तैनात केले आहेत. लोकप्रिय गणपती मंडळ लालबाग, गिरगाव, अंधेरी या भागात दीड, पाच, सात आणि दहा दिवस अर्थात अनंत चतुर्दशीपर्यंत मोठा बंदोबस्त असणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिसांनी बेस्टच्या बसेस, लोकल ट्रेन आणि मेट्रो सेवांमध्येही समन्वय साधला आहे. हा सण शांततेत साजरा करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
लोकप्रिय गणेशोत्सव मंडळांकडे जाणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले असून ते दुस-या मार्गाने वळवण्यात आले आहेत. लालबाग राजाच्या आजूबाजूचे रस्ते गर्दीच्या वेळी वाहनांना वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. मात्र वाहतूक विस्कळित होऊ नये, यासाठी आपत्कालीन वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत. दरम्यान, पुण्यात मानाचे पाच गणपती आणि इतर प्रमुख गणेश मंडळांची गेल्या अनेक वर्षांपासून वैभवशाली परंपरा आहे. ही परंपरा यावर्षीही जपण्यात आली आहे. यंदाही सार्वजनिक मंडळांकडून आकर्षक देखावे आणि बाप्पाच्या स्वागतासाठी तयारी पूर्ण केली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातही कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
दगडूशेठ येथे जटोली
शिवमंदिराचा देखावा
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे दरवर्षी गणेशोत्सवात देशभरातील सुप्रसिद्ध अशा मंदिराची प्रतिकृती देखावा म्हणून तयार केली जाते. यंदा १३२ व्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. गणेशोत्सवात साकारण्यात आलेल्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे.