लातूर : प्रतिनिधी
डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून मनपा लातूरचे आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे यांच्या सूचनानुसार शनिवारी लातूर महानगरपालिकेमार्फत शहरातील श्री विलासराव देशमुख (नाना-नानी) पार्क तलाव, खणी भागातील तलाव तसेच इतर छोटे पाणीसाठे या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. याप्रसंगी मनपा उपायुक्त्त डॉ. पंजाबराव खानसोळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती यांचे सह जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय अंतर्गत मनपा कार्यक्षेत्रात असणारे आरोग्य सहाय्यक यांची उपस्थिती होती.
पावसाळयामध्ये डास संख्या नियंत्रित करण्यामध्ये गप्पी मासे महत्त्वाची भूमिका बजावतात. जलाशय, तलाव, पाणीसाठे यामध्ये डासांनी प्रजननासाठी घातलेली अंडी असतात, त्या अंड्यांमधून डास आळी बाहेर येतात आणि नंतर त्याचे रूपांतर प्रौढ डास असे होत असते. मोठ्या जलाशयात सोडलेले गप्पी मासे डास आळी खाऊन टाकतात आणि त्याद्वारे डास नियंत्रणामध्ये मोलाचा हातभार लावतात. शहरामध्ये डेंग्यू रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे कीटकजन्य आजार प्रतिबंधाकरिता विविध उपाय योजना महानगरपालिके मार्फत राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये एबॅंिटग मोहीम, कंटेनर सर्वेक्षण, धूर फवारणी यासह आरोग्य शिक्षण विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संवेदीकरण करणे, या बाबींचा समावेश आहे. त्यासोबतच शहरातील मोठ्या तलावांमध्ये गप्पी मासे सोडल्यामुळे डास उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये मोठी मदत मिळणार आहे.
मनपा उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी सर्व नागरिकांना आपापल्या घरामध्ये, बाजूच्या परिसरामध्ये तसेच कामकाजाच्या ठिकाणी देखील, अशी ठिकाणे असतील तर ती नष्ट करणे किंवा डास उत्पत्ती होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, याकरिता सर्व नागरिकांनी या डेंगी विरोधी मोहिमेमध्ये सहभागी होण्याकरिता आवाहन केलेले आहे.
जर कोणाला ताप अंगदुखी किंवा अंगावर पुरळ, लालसर चट्टे येऊन आलेला ताप यासारखे डेंग्यू किंवा डेंग्यू सदृश्य रोगाची लक्षणे असल्यास आपण तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, याकरिता महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती यांनी केले आहे.