बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था
गरोदरपणात घरुन काम मागितल्याने एका महिला कर्मचा-याला कामावरुनच काढून टाकल्याची घटना घडली. मात्र, हा निर्णय कंपनीच्या चांगलाच अंगलट आला आहे. कारण, या निर्णयाविरोधात महिलेने न्यायालयाने दार ठोठावले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कामगार न्यायालयाने गर्भवती महिलेच्या कंपनीला नोकरीवरून काढून टाकल्यानंतर सुमारे १ कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
पीडित महिलेने वर्क फ्रॉम होम मागितल्याने, बॉसने तिला ऑफिसमध्ये काम करणा-या लोकांची गरज आहे, असा संदेश पाठवून कंपनीतून काढून टाकले. ही घटना ब्रिटनमध्ये घडली असून पॉला मिलुस्का असे पीडित महिलेचे नाव आहे. पॉलाने मळमळ होत असल्याने तिच्या बॉसकडे घरून काम करण्याची परवानगी मागितली होती. यावर बॉस अम्मारने महिलेची परिस्थिती जाणून न घेता उद्धटपणे मॅसेज केला. या मॅसेजमध्ये जॅझ हॅण्ड्स इमोजीचाही वापर करण्यात आला. ज्याचा अर्थ मी काय करू असा होतो. या मॅसेजमध्ये ऑफिसमध्ये काम करणा-या लोकांची गरज असल्याचे लिहिले होते. जॅझ हॅण्ड्स इमोजी वापरावर कोर्टाने तीव्र आक्षेप घेतला.
ब्रिटनच्या कामगार न्यायालयाने कंपनीच्या या कारवाईमुळे चांगलेच खडेबोल सुनावले. गरोदरपणामुळे एखाद्या महिलेला कामावरून काढून टाकणे अन्यायकारक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाने बर्मिंगहॅममधील रोमन प्रॉपर्टी ग्रुप लिमिटेडला ९३,६१६.७४ पाउंडची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. मिलुस्का ही महिला एक गुंतवणूक सल्लागार आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये, पॉलाला आपण गर्भवती असल्याचे समजले. एक दिवस मॉर्निंग सिकनेसमुळे तिची तब्येत बिघडली. यावेळी तिने बॉसकडे घरून काम करण्याची परवानगी मागितली. परंतु, कंपनीने तिला नोकरीवरून काढून टाकले. कंपनीने पॉलाला ऑफिसमध्ये येऊन दररोज काही तास काम करण्यास सांगितले होते. यावरही कंपनीने आक्षेप घेतला.