शिवसेनेत राठोड, सावंत, केसरकरांना वगळणार?
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या नव्या सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारासाठी रविवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळात भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना अर्धचंद्र देण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या गिरीश महाजन व रवींद्र चव्हाण यांना तर शिवसेनेच्या संजय राठोड, तानाजी सावंत व दीपक केसरकर यांना मंत्रिपदाऐवजी संघटनेतील महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर आठवडा उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे नागपूर येथे होणा-या हिवाळी अधिवेशनेच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्येच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे सर्वाधिक म्हणजे २२ मंत्री असतील तर शिवसेनेचे १२ मंत्री असणार आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. चार ते पाच मंत्री वगळता उर्वरित सर्व मंत्र्यांचा शपथविधी रविवारी पार पडणार आहे.
नव्याने स्थापन होणा-या मंत्रिमंडळात जुन्या मंत्रिमंडळातील गिरीश महाजन व रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्षवाढीची जबाबदारी देण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतल्याचे समजते. यापैकी गिरीश महाजन यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असून, रवींद्र चव्हाण यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत या दोघांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी राज्यातील भाजपचे नेतृत्व दिल्लीतील भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत होते.