लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी दि.१७ डिसेंबर रोजी लातूर मल्टीस्टेट बँकेत दिशा फाउंडेशनच्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अर्थिक अडचणीत असलेल्या ११ विद्यार्थ्यांना १ लाख ८२ हजार रुपयांचे धनादेश देऊन पुढील शिक्षणासाठी बळ देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन यशवंत पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गणेश देशमुख, झीशान पटेल, धनंजय देशमुख, बाळासाहेब जाधव उपस्थित होते. ग्रामीण भागातील केवळ हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण थांबत असलेल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देऊन चला मुलांनो घ्या भरारी हा उदात्त विचार मनाशी बाळगून गुणवंत विद्यार्थ्यांची सक्षम पिढी घडविण्यासाठी गेली तीन ते चार वर्षांपासून शेकडो विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेश शुल्क भरण्यासाठी मदतीचा हात देण्याचे काम दिशा प्रतिष्ठान करीत असून ही संस्था पिढी घडवण्याचे कार्य करीत आहे, असे उद्गार यशवंतराव पाटील काढले. या वेळी गणेश देशमुख यांनी ही मनोगत व्यक्त करताना दिशा प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला.
दिशा प्रतिष्ठानच्या वतीने नाईकवाडे अलीफरमान २५ हजार, प्रथम स्वामी २० हजार, रचना रिंगणकर २० हजार, तांबोळी शाहनबाज २० हजार, रामलिंग स्वामी २० हजार, वाघमारे पार्वती २० हजार, साक्षी तिरकुळे २० हजार, शिंदे रमाकांत१५ हजार, भाग्यश्री नणंदकर ११ हजार, नारुळे वैष्णवी १० हजार, तांबोळी मुस्कान १९००, या होतकरु ११ विद्यार्थ्यांना १, ८२,९०० रुपयांचे शैक्षणिक फीस करिता सहकार्य करून त्यांच्या पंखांना बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
धनादेश वाटप कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले यांनी प्रतिष्ठानच्या वतीने प्रामुख्याने कार्य होत असलेल्या विद्यार्थ्याना शैक्षणिक सहकार्य कश्या प्रकारे केली जाते व फिरता दवाखाना या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू रुग्णाच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जाते या बाबतची सर्व माहिती देऊन केली. सुत्रसंचलन आशिष वांजरखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शुभम आवाड, सूरज सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.