30.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeराष्ट्रीयगुरुग्राममधील कंपनीला भीषण आग, दोन कामगारांचा मृत्यू

गुरुग्राममधील कंपनीला भीषण आग, दोन कामगारांचा मृत्यू

गुरुग्राम : हरियाणातील गुरुग्राम येथील फायर बॉल कंपनीत रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत कंपनीच्या दोन कर्मचा-यांचा होरपळून मृत्यू झाला, तर ६ जण जखमी झाले आहेत. अग्निशमनच्या १० गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले असून, सध्या कंपनीतील बेपत्ता कामगारांचा शोध सुरू आहे, अशी माहिती गुरुग्राम पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी दौलताबाद, गुरुग्राम येथील औद्योगिक परिसरात असून, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास या कंपनीला आग लागली. फायर बॉल कंपनीला लागलेल्या आगीने आजूबाजूच्या कंपन्यांनाही आपल्या कवेत घेतले. अग्निशमन अधिकारी रमेश सैनी यांनी सांगितले की, कंपनीत लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात आली आहे. होरपळलेल्या कर्मचा-यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर शोध मोहिमेदरम्यान दोन मृतदेह सापडले.

दरम्यान, कंपनीला आग लागल्यानंतर कंपनीत अनेक स्फोट झाले ज्याचे आवाज दूरवर ऐकू येत होते. सध्या जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण केले असून शोधमोहीम सुरू आहे. प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, फायर बॉल कंपनीत आग लागल्याने रात्रभर स्फोट होत होते त्यामुळे आजूबाजूची घरेही हादरली. डीसीपी करण गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६ जण जखमी झाले आहेत त्यापैकी दोन जखमींची प्रकृती गंभीर असून, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही, असे डीसीपी गोयल म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR