शिंदेंना तिन्हीपैकी एक खाते निवडावे लागणार, शिवसेनेपुढे पेच
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आता महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. शपथविधीअगोदरपासून एकनाथ शिंदे यांनी गृह मंत्रालयाचा आग्रह धरला आहे. ते अजूनही त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. परंतु भाजप हे खाते त्यांना देण्यास तयार नाही. आता भाजपने शिंदे यांची मनधरणी करण्याऐवजी गृहखात्याऐवजी त्यांच्यासमोर तीन पर्याय दिले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. यात गृह खात्याच्या तोडीस तोड असलेल्या खात्याची निवड शिवसेना शिंदे गटाला करायची आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
गृहमंत्रालयाच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांच्यापुढे महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या तीन खात्यांचा पर्याय देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेकडून आता या खात्यांचा विचार सुरु आहे. शिवसेनेला या ३ खात्यांच्या पर्यांयांपैकी १ पर्याय निवडावा लागणार आहे. गृहखात्याइतकेच महत्वाचे तोडीस तोड खाते मिळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मात्र, ऊर्जा आणि गृहनिर्माण खाते शिवसेनेला मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे वरील ३ पर्यायांपैकी एक खाते शिंदे गटाच्या वाट्याला येऊ शकते. यात महसूल वजनदार खाते आहे. गत महायुती सरकारमध्ये महसूल खाते भाजपकडे होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या खात्याची धुरा होती तर सार्वजनिक बांधकाम हेही खाते भाजपकडेच होते.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच मंत्रिमंडळात गृह, महसूल खात्यांना थोडे महत्त्व असते. आमच्या महायुतीत तीन पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांचा योग्य तो सन्मान राखण्यात येणार आहे. तसेच गृहखाते तुमच्याकडेच असेल का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्मीतहास्य करीत जेव्हा निर्णय होईल, तेव्हा मी तुम्हाला सांगेन, असे उत्तर दिले. त्यामुळे गृहखात्याचा सस्पेन्स कायम आहे. मात्र, दिल्लीतील केंद्रीय गृहखात्याचा व राज्यातील गृहखात्याचा समन्वय चांगला होण्यासाठी ते खाते आमच्याकडे असेल तर चांगले होईल, असे फडणवीस म्हणाले.