बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपींनी हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात गेला आहे. याच मुद्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे हताश, हतबल आणि गोंधळलेले असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपींनी त्यांनीच हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात गेला आहे. याच मुद्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेची अवस्था दारुण झाली आहे, असे टीकास्त्र राऊतांनी डागले आहे.
प्रसार माध्यमांसमोर खासदार संजय राऊत म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. ही गोष्ट खरी आहे आणि या आरोपींच्या आकाला वाचवण्यासाठी या राज्याचे गृहमंत्री काही काळ प्रयत्न करत होते. आज ते साता-याच्या एका आकाला वाचवत आहेत किंवा अन्य काही लोकांना वाचवत आहेत. कामराच्या हॅबिटॅट स्टुडिओवर ज्यांनी हल्ला केला आणि कुणाल कामराला जे ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवले जात आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेची अवस्था दारुण झालेली आहे. याचे कारण गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
याचवेळी राऊतांना वाघ्या श्वानाच्या समाधीवरून चाललेल्या वादावरही विचारणा करण्यात आली आहे. याबाबत ते म्हणाले की, मनोहर भिडे आणि छत्रपती संभाजीराजे यांनी एकत्र बसून तो मामला पुढे न्यावा, महाराष्ट्राला त्यात ओढू नये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबरचे सगळेच मावळे, प्राणी आणि पक्षी हे निष्ठावान म्हणून गणले जातात. इतिहासामध्ये काही दाखले, काही संदर्भ ते इतक्या वर्षांनंतर खोदकाम करणे योग्य नाही. लोकांनी काही संदर्भ भावनिकदृष्ट्या स्वीकारले असतात. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होतील अशी भूमिका कोणत्याही शहाण्या नेत्याने घेऊ नये, या मताचे आम्ही आहोत. ताराराणी यांनी औरंगजेबाला झुंजवले आणि मराठ्यांचे शौर्य काय आहे हे दाखवले. ज्या लोकांना औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची आहे त्यांनी ताराराणींच्या स्मारकाकडे नजर टाकावी आणि आपले काही चुकत आहे का हे पाहावे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.