नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी रेल्वेच्या एकूण १८,६५८ कोटी रुपयांच्या ४ मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली. यामुळे महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील १५ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे जाळे सुमारे १,२४७ किमीने वाढणार आहे. यात महाराष्ट्रातील ४,८१९ कोटी रुपयांच्या गोंदिया-बल्हारशाह मार्गावरील २४० किमी लांबीच्या लोहमार्ग दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे.
गोंदिया-बल्हारशाह हा महाराष्ट्रातील रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. २४० किमी लांबीचा हा प्रकल्प असून यासाठी ४,८१९ कोटी रुपये खर्च येईल. यामुळे या भागात रेल्वेची क्षमता वाढेल. यामुळे पर्यटनाला आणखी चालना मिळेल. तसेच या प्रदेशातील अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
छत्तीसगडमधील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाने ६१५ किमी लांबीचा नवीन रेल्वे मार्ग उभारण्यासाठी ८,७४१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याला आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या मार्गावरील रस्ते वाहतुकीच्या तुलनेत या नवीन रेल्वे मार्गामुळे लॉजिस्टिक खर्चात २,५२० कोटी रुपयांची बचत होईल. हा देशातील सर्वात मोठ्या रेल्वे प्रकल्पांपैकी एक असेल, असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची घोषणा करताना सांगितले.
ओडिशात ३,९१७ कोटी रुपये खर्चाचा २७७ किमी लांबीच्या प्रकल्प उभारला जात आहे. यामुळे संबलपूर आणि जरापाडा दरम्यान तिसरा आणि चौथा मार्ग जोडला जाणार आहे. तर चौथा प्रकल्प ओडिशातील असून, येथील झारसुगुडा – ससोन दरम्यान तिसरा आणि चौथा मार्ग जोडला जाईल.