लातूर : प्रतिनिधी
दिवाळी सणाच्या तोंडावर ग्रामपंचायत कर्मचा-यांसाठी गोड बातमी आली आहे. ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतनाच्या फरकाची रक्कम शासनाकडून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे आली जिल्हयातील १ हजार ४४१ ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या खात्यात दोन दिवसात ४ कोटी ४० लाख रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे.
लातूर जिल्हयातील १ हजार ४४१ ग्रामपंचायत कर्मचा-यांना गावात दिवाबत्तीची सोय करणे, पाणी पुरवठा करणे, ग्रामपंचायत परिसरात स्वच्छतेची कामे करणे, कराची वसूली करणे, लिपीकांची कामे करणे, विविध योजनांची माहिती गावात नागरीकांना देणे, जनजागृती आदी कामे नित्य नियमाने करावी लागतात. या कर्मचा-यांना ५ हजार लोकसंख्या, ५ ते १० हजार लोकसंख्या, १० हजार पेक्षा जास्त लोकसंख्या अशा परिमंडळानुसार सप्टेंबर २०२० पूर्वी ५ हजार १०० ते ६ हजार ९०० रूपये वेतन मिळत होते. सप्टेंबर २०२० पासून या कर्मचा-यांच्या पगारात वाढ होऊन ती उत्पन्न, लोकसंख्या व कर वसूलीनुसार ५० टक्के, ७५ टक्के, १०० टक्के शासनाच्या मदतीने सध्या ११ हजार ६२५ ते १४ हजार १४५ रूपयांपर्यंत सध्या वेतन मिळत आहे.
जिल्हयातील १ हजार ४४१ ग्रामपंचायत कर्मचा-यांना सप्टेंबर २०२० पासून वेतनवाढ झाली आहे. मार्च २०२२ पर्यंत म्हणजे १९ महिण्याच्या फरकाची ९ कोटी २९ लाखाची रक्कम शासनाकडे प्रलंबीत होती. त्यापैकी फक्त ९ महिण्याचे प्रलंबीत ४ कोटी ४० लाख रूपये लातूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे आले आहेत. दिवाळी सणाच्या तोंडावर कर्मचा-यांना सदर रक्कम दोन दिवसात वर्ग करण्यासाठीच्या हालचाली जोरदारपणे सुरू आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत कर्मच-यांची माहिती घेवून त्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाणार आहे.