17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरग्रामसेवक झाले ग्रामपंचायत अधिकारी 

ग्रामसेवक झाले ग्रामपंचायत अधिकारी 

लातूर : प्रतिनिधी
ग्रामपंचायतीचा कारभार चालवण्यासाठी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे कार्यरत होते. शासनाने या दोन्ही पदांचे एकत्रित करुन सदर पदाचे नामाभिदान ग्रामपंचायत अधिकारी असे केले आहे. त्यामुळे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे आता ग्रामपंचायत अधिकारी म्हणून त्या-त्या ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार आहेत.
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे पद ग्रामीण भागातील सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी शासन व जनता यांना जोडणारे व प्रत्यक्ष अंमलबजावणी करणा-या यंत्रणेचे महत्वाचे पद व घटक आहे.  ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचे सचिव व ग्रामसभेचे पदसिध्द सचिव म्हणून कामकाज पाहतात. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदांच्या कामाचे स्वरूप एकच असल्याने सदर दोन्ही पदे एकत्रित करून एकच पद निर्माण करण्यासाठी तज्ञ समिती नेमली होती. सदर समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील ग्रामसेवक (एस-८) व ग्रामविकास अधिकारी (एस-१२) ही दोन्ही पदे एकत्रित करून एस-८ या वेतनश्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नामाभिदान ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात आले.
सध्या अस्तित्वात असलेल्या ग्राम विकास अधिकारी या पदांचे वेतन संरक्षित करुन व ही पदे मृत संवर्गामध्ये वर्गीकृत करुन तद्नंतर रिक्त होणा-या या पदांवर ग्रामपंचायत अधिकारी हे नामाभिदान असण-या एस-८ वेतन श्रेणीतील एकाच पदावर नवीन नियुक्त्या करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत अधिकारी या पदास सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत १० वर्षाच्या सेवेनंतर पहिला लाभ विस्तार अधिकारी एस-१४, २० वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाम सहायक गट विकास अधिकारी एस-१५ व ३० वर्षाच्या सेवेनंतर तिसरा लाभ गट विकास अधिकारी एस-२० असा लाभ दिला जाणार आहे.
सदर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची सध्या असलेली सेवाज्येष्ठता विचारात घेऊन त्यानुसार एकत्रित पदासाठी सेवाज्येष्ठता यादी नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर तयार करावी. यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सेवाज्येष्ठत्तेमध्ये बदल होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सुचनाही शासनाने दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR