जळकोट : प्रतिनिधी
एक काळ असा होता की, जळकोट तालुका आणि आसपासच्या परिसरात उन्हाळ्याच्या हंगामात फक्त गावराण आंबा उपलब्ध असायचा. प्रत्येक शेतक-यांच्या शेतात अनेक आंब्याची झाडे होती. त्यांना आमराई असे म्हणत. शाळेच्या सुट्टीत मुले आंबे खाण्यासाठी त्यांच्या मामाच्या गावी जात होते. आता गावराण आंबा दुर्मिळ झाला असून, ही परंपरासुद्धा हळूहळू संपुष्टात येत आहे.
कालांतराने जुनी आंब्याची झाडे सुकली आणि नवीन झाडे लावली गेली नाही. ज्यामुळे गावराण आंब्याच्या झाडांची संख्या खूपच कमी झाली. बदललेले वातावरण तसेच प्रचंड प्रमाणात झालेली वृक्षतोड यामुळे आंब्याच्या आमराया संपुष्टात आल्या. पूर्वी गावराण आंबा आमराईमधून तोडून घरी पिकवायचे आणि नंतर ते शहरात येऊन विकायचे. शंभरीच्या हिशोबाने आंबा विकत होते. लोक त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे गावराण आंबे खरेदी करायचे. आता हा ट्रेंड बदलला असून आंब्याचा रसही दुर्मिळ होत चालला आहे. आता आंबा बाहेर राज्यातून येत आहे व त्याचा रस बनविला जात आहे. बदलत्या काळानुसार गावराण आंब्याचे महत्त्व: राहिले नाही. पूर्वी घरी आलेल्या पाहुण्यांना नास्त्यात आंबा आणि दुपारच्या जेवनात आमरस दिला जात असे. पण आज ते राहीले नाही.
गावरान आंब्याच्या कमतरतेमुळे इतर आंब्याची मागणीही झपाट्याने वाढत आहे. आज बाजारात केशर, बदाम, दसेरी, हापूस, लालबाग, कलमी आणि नीलम असे विविध प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत. यातील बहुतेक आंबे कृत्रिम प्रक्रियेने पिकविले जातात आणि त्यांची किंमत ८० रुपये प्रतिकिलो ते २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत असते. त्या सर्वांची ग्राहकांमध्ये मागणी आहे.