17.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रघटनेमागचा सूत्रधार कोण, तात्काळ शोधून काढले पाहिजे

घटनेमागचा सूत्रधार कोण, तात्काळ शोधून काढले पाहिजे

बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी या घटनेच्या खोलात गेले पाहिजे. या घटनेमागचा सूत्रधार कोण, हे तात्काळ शोधून काढले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. ते मस्साजोगमध्ये बोलत होते.

शरद पवारांनी मस्साजोगमध्ये जाताच सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावर त्यांनी बीडमध्ये ही गोष्ट घडत आहे ती बरोबर नाही. न्याय मिळाला पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्या खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

राज्य आणि केंद्राने याची नोंद घ्यायला हवी
जे घडले ते योग्य नाही. वादविवादापासून दूर राहणारा आणि संवाद साधणारा लोकप्रतिनिधी म्हणून तो काम करत होता. जे घडलं त्याचा काही संबंध नाही. त्याला दमदाटी केली. त्याची चौकशी केली. चौकशी का करतो म्हणून बाहेर न्यायचं आणि हल्ला करायचा. आणि हल्ला हत्येपर्यंत जातो. हे चित्र गंभीर आहे. याची नोंद राज्य आणि केंद्राने घ्यायला पाहिजे, असे शरद पवारांनी म्हटले.

दुखणे मांडण्याचा प्रयत्न केला
बजरंग सोनवणे यांचे भाषण ऐकले. राज्यात काय चाललंय हे खासदारांनी ऐकलं. सूत्रधार पकडला पाहिजे असे सोनवणे यांनी सांगितले. आरोपीचे जे संवाद कुणाबरोबर झाले, त्याची माहिती काढली पाहिजे आणि त्याच्या खोलात गेले पाहिजे, अशी मागणी सोनवणे आणि लंके यांनी लावून धरली. आता महाराष्ट्रातील विधानसभेत बीडचे आमदार क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड यांनीही हा प्रश्न मांडला. कोणत्या समाजाचे आणि कोणत्या जातीचे आहेत हा विचार केला नाही. अन्याय झाला, त्यामुळे दुखणे मांडण्याचा प्रयत्न केला, असेही शरद पवार म्हणाले.

आम्ही स्वस्थ बसणार नाही
रक्कम दिली, मदत होईल; पण गेलेला माणूस येत नाही. मदत दिली तरी कुटुंबाचे दु:ख जाणार नाही. आम्ही त्यावर टीका करत नाही. पण याच्या खोलात जाऊन चौकशी करा. सूत्रधाराला तातडीने धडा शिकवला पाहिजे. बीडमध्ये ही गोष्ट घडतेय. ही गोष्ट बरोबर नाही. न्याय मिळाला पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्या खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही शरद पवार यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR