लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील गोर-गरीब लोकांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळावा यासाठी शासनाकडून घरकुल आवास प्लस सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली होती. यासाठी १५ मे ही तारीख अंतिम होती. परंतु, नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी शासनाकडे केली होती. शासनाने मागणीची दखल घेत मुदतवाढ दिली आहे.
अनेक गावांमध्ये विविध कारणांमुळे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले नव्हत. त्यामुळे अनेक गरजू कुटुंब याच्या लाभापासून वंचित राहणार होते. ही बाब लक्षात घेऊन लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांच्याशी संपर्क साधून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात चर्चा केली तसेच या सर्वेक्षणासाठी मुदतवाढ मिळावी यासंबंधी पत्राद्वारे शासनाकडे विनंती केली केली होती. त्यानुसार या सर्वेक्षणासाठी ३१ मे २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे परिपत्रक राज्यसरकारने जारी केले आहे. मागणीची दखल घेतल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करुन सर्वेक्षणासाठी मुदतवाढ मिळाली असल्याने संबंधित व्यक्तीनी घरकुलाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले आहे.