चिपळूण : प्रतिनिधी
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे आता राजकारण तापणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. चिपळूणमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी काका-पुतणे एकत्र येणार का? असा खोचक सवाल केला. त्यावर उत्तर देताना खासदार शरद पवार यांनी ‘घरात आम्ही एकत्रच आहोत…’असे मिश्किल शब्दांत उत्तर दिले आणि अधिक बोलणे टाळले.
दरम्यान, राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा रणसंग्राम तोंडावर असताना आता युती आणि आघाडी समोरासमोर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातील चिपळूण येथे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा घेतली. तर दुस-या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मोठी जाहीर सभा झाली. या निमित्ताने खासदार शरद पवार चिपळूणमध्ये दाखल झाले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ‘घरात आम्ही एकत्रच…’ असा उच्चार करून राजकीय गोटात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या व्यक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
वास्तविक चिपळूणमध्ये पुतण्याची सभा झाल्यानंतर काकांची जंगी सभा झाली. दोघांनी स्वतंत्र राष्ट्रवादी पक्ष स्थापन केले आहेत. दोन्ही पक्षांच्या वतीने न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे? चिन्हासाठी देखील कायदेशीर मार्गाने लढाई लढली जात आहे. काका-पुतणे राजकारणात परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. खा. शरद पवार महाविकास आघाडीत तर उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमध्ये सामील झाले आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हे काका-पुतणे युती आणि आघाडीच्या बाजूने वेगवेगळ्या ठिकाणी जागा लढवणार आहेत. मात्र राज्यातील काही मतदारसंघांत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी सामना
यामध्ये बारामतीबरोबरच चिपळूणमध्ये देखील राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. आघाडीच्या जागावाटपानंतर त्याला अधिक स्पष्टता मिळणार आहे. राजकारणात परस्परांच्या विरोधी भूमिका घेणारे काका-पुतणे पवार घराण्यात मात्र एकत्रच आहोत असे काकांनी जाहीर केल्याने राजकीय गोटात भुवया उंचावल्या आहेत.