मुंबई : प्रतिनिधी
घाटकोपरमधील एका सोसायटीत मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मांसाहार करणा-या मराठी कुटुंबाला ‘तुम मराठी लोग गंदा है’ असे म्हटल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या घटनेचा निषेध केला असून, सोसायटीतील सदस्यांना समज दिली आहे. हा प्रकार मुंबईतील मराठी विरुद्ध अमराठी वाद पुन्हा एकदा चर्चेत आणतो.
दरम्यान, स्वप्नांचे शहर असलेल्या मुंबईत विविध जातीचे, धर्माचे लोक येतात आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने इथे मेहनत करून राहतात. कोणी काय खावे-प्यावे हा खरेतर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत खाण्या-पिण्याच्या मुद्यावरून वाद होताना दिसत असून महाराष्ट्राचा, मुंबईचा सख्खा पुत्र असलेल्या मराठी माणसांनाच अपमानास्पद वागणूक मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये परप्रांतीय कुटुंबांनी बाहेरून गुंड आणून मराठी कुटुंबाला मारहाण केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मराठी माणसांना मुंबईत चुकीची वागणूक दिल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून घाटकोपरमध्ये याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे.
घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मांसाहार करतात म्हणून गुजराती कुटुंबाकडून मराठी कुटुंबातील लोकांचा अपमान केला गेला असा मनसेचा आरोप आहे. मनसे पदाधिका-याने यासंदर्भातील पोस्ट केली असून त्यामुळे मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी हा वाद शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. यामुळे नवा गदारोळ माजण्याची शक्यता आहे.
मनसेने घेतली धाव
हा प्रकार समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी तेथे धाव घेतली आणि सोसायटीतील सदस्यांना चांगलीच समज दिली. मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी सोसायटीत शिरून तेथील संबंधित गुजराती आणि जैन रहिवाशांना या घटनेचा जाब विचारत त्यांना खडसावले.