कोल्हापूर : प्रतिनिधी
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. मंगळवारी सैन्याचे कपडे घालून चार ते पाच दहशतवाद्यांनी एके-४७ रायफलने बेछूट गोळीबार केला.
यामध्ये देशभरातून फिरायला आलेल्या २८ निष्पाप पर्यटकांचा दहशतवाद्यांनी जीव घेतला. अनेकजण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यातून कोल्हापूरमधील २८ जण थोडक्यात बचावले. त्याला कारण ठरले घोडे.. होय, वेळेवर घोडे मिळाले नाहीत, त्यामुळे कोल्हापूरमधील २८ जण पहलगाममध्ये पोहोचले नाहीत.
दैव बलवत्तर म्हणून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातून कोल्हापुरातील २८ पर्यटक वाचले. वेळेत घोडे न मिळाल्याने कोल्हापुरातील अनिल कुरणे आणि त्यांच्या सहका-यांना पहलगामपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला, त्यावेळी कोल्हापूरमधील २८ जण फक्त दीड किमी दूर अंतरापर्यंत पोहोचले.
ते पहलगामकडेच निघाले होते. त्यावेळी एका ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्व २८ जण जीव मुठीत घेऊन माघारी परतले. सध्या अनिल कुरणे आणि त्यांच्यासोबतचे सहकारी जम्मू- काश्मीरमध्ये सुखरूप आहेत. ते लवकरच कोल्हापूरला परतणार आहेत.