36.1 C
Latur
Sunday, April 27, 2025
Homeमहाराष्ट्रचंद्रपुरात ४५.६ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद

चंद्रपुरात ४५.६ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद

चंद्रपूर : राज्यातील तापमानात प्रचंड वाढ होत असून सूर्यदेव जणू काही आग ओकत असल्याचा अनुभव येत आहे. राज्यातील सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस इतके तापमानाची नोंद  चंद्रपूरमध्ये झाली असून हवामान विभागाकडून चंद्रपूरमध्ये पुढील तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासह मराठवाडा व खान्देशातील देखील उच्चांकी तापमानाकडे वाटचाल सुरू आहे. परिणामी दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत.

गेल्या आठवड्यात वादळी वारा आणि अवकाळी पाऊस अनुभवलेल्या चंद्रपुरात ४५.६ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काल नोंदविण्यात आलेले तापमान राज्य आणि देशातच नाही; तर जगात सर्वांत उच्चांकी ठरले आहे. विशेष म्हणजे पुढील तीन दिवस हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात अशाच प्रकारे तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला असून यलो अलर्ट जारी केला आहे.

चंद्रपुरात या तापमानामुळे अत्यावश्यक कामांसाठीच लोक बाहेर पडताना दिसत आहेत. दुपारच्या दरम्यान सर्व प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तापमान एवढे आहे की, घरातील एसी आणि कुलर देखील काम करेनासे झाले आहेत. दरवर्षी तापमानाचा उच्चांक चंद्रपूर शहर गाठत आले आहे. ‘नेमेचि येतो उन्हाळा’ असे म्हणत ताप सहन करण्याशिवाय पर्याय नाही. तशी मानसिकताच नागरिकांनी केली आहे. त्यामुळे तापमान कितीही वाढले, तरी रहाटगाडगे चालू ठेवण्याशिवाय लोकांकडे पर्याय नाही.

विदर्भासह मराठवाडा तापला
राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. वाढत्या तापमानात अंगाची अक्षरश: लाही लाही होत आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांतील तापमान हे सर्वांत जास्त नोंदविले जात आहे. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात देखील तापमान ४० अंशाच्या पार गेले आहे. यात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तापमान ४३ अंशाच्या जवळपास रहात आहे. तर नाशिक जिल्ह्यात देखील पारा ४० च्या वर गेला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR