30.5 C
Latur
Saturday, May 31, 2025
Homeमहाराष्ट्रचंद्रपूर जिल्ह्यात आढळले दुर्मीळ खडकचित्र

चंद्रपूर जिल्ह्यात आढळले दुर्मीळ खडकचित्र

अश्मयुगीन इतिहासाच्या पाऊलखुणा

चंद्रपूर : प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. प्राचीन काळातील अनेक पाऊलखुणा येथे आढळून येतात. त्यात आणखी भर पडली आहे, ती अश्मयुगीन खडकचित्रांची. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली या गावाजवळ अशी तब्बल ६० ते ७० कोरीव खडकचित्रं आढळली आहेत. महापाषाण युगात येथील भूभागावर मानव टोळ्या करून वास्तव्य करीत होते हे या संशोधनातून समोर आले आहे. प्राचीन खडककलेचा समृद्ध वारसा हा सिंधू संस्कृतीइतकाच पुरातन आहे, असा दावा इतिहास अभ्यासक अरुण झगडकर यांनी केला आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावाजवळ तब्बल ६० ते ७० कोरीव खडकचित्रं आढळली आहेत. भारतातील प्राचीन खडककलेचा समृद्ध वारसा हा सिंधू संस्कृतीइतकाच पुरातन असून, त्याचे अनेक अवशेष महाराष्ट्राच्या विविध भागांत विखुरलेले आहेत. ‘पेट्रोग्लिफ्स’ हा प्राचीन खडककलेचा एक प्रकार आहे. यात खडकाच्या पृष्ठभागावर विविध रेषात्मक, चित्रात्मक आकृती कोरण्यात आलेल्या असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावाजवळ नुकत्याच सापडलेल्या अशाच प्रकारच्या पेट्रोग्लिफ्समुळे या भागात एक नवा पुरातत्त्वीय संदर्भ पुढे आला आहे.

वढोली हे गाव विदर्भाच्या दक्षिणेकडील चंद्रपूर जिल्ह्यात, जंगलविस्तार आणि खडकाळ भूभागाच्या सीमेवर वसलेले आहे. या गावात सापडलेले ‘पेट्रोग्लिफ्स’ हे एका छोट्याशा खडकाळ उंचवट्यावर उघड्यावर आहेत. या परिसरात सध्या कोणतीही नदी किंवा पुरातन जलस्रोत नाही. परंतु प्राचीन काळात याठिकाणी मानवी वस्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याठिकाणी अंदाजे ६० ते ७० दगडांवर कोरीव आकृत्या स्पष्ट दिसून येतात. मुख्यत: या आकृत्या सरळ, आडव्या आणि तिरक्या रेषांनी बनलेल्या आहेत. काही ठिकाणी क्रॉस, चौकोन किंवा जाळीप्रमाणे रचना दिसून येते. कोरण्याची शैली पाहता, दगडावर टोकदार वस्तूने ठोकून किंवा घासून या आकृती बनवल्या असाव्यात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR