हैदराबाद : वृत्तसंस्था
चंद्राबाबू नायडू यांनी १९९२ मध्ये ‘हेरिटेज फूड्स’ कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी डेअरी उत्पादनांचा व्यवसाय करते. नायडूंच्या विजयानंतर गेल्या ५ दिवसांपासून त्यांचे शेअर्स गगनाला भिडत आहेत. गेल्या ५ दिवसात सुमारे ५५ टक्क्यांनी वाढ झाली. एक्झिट पोलने नायडूंच्या तेलुगु देसम पक्षाच्या (टीडीपी) मोठ्या विजयाचा अंदाज वर्तवल्यानंतर दोन दिवसांनी हेरिटेज फूड्सचे शेअर्स ४२४ रुपयांवर व्यवहार करत होते.
तेव्हापासून हा शेअर सातत्याने वाढत आहे आणि आज शुक्रवारी तो ६६१.२५ रुपयांवर बंद झाला, जो आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे. या वाढीसह हेरिटेज फूड्सचे बाजार भांडवल या आठवड्यात २,४०० कोटी रुपयांनी वाढले आहे. कंपनीचे मार्केट कॅप ७ जून रोजी ६,१३६ कोटी रुपये झाले, जे एका आठवड्यापूर्वी ३,७०० कोटी रुपये होते.
एक्सचेंजवर उपलब्ध माहितीनुसार, चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबाकडे हेरिटेज फूड्समध्ये ३५.७ टक्के हिस्सा आहे. त्यांची पत्नी भुवनेश्वरी यांच्याकडे २४.३७ टक्के, तर मुलगा लोकेश आणि सून ब्राह्मणी यांच्याकडे अनुक्रमे १०.८२ टक्के आणि ०.४६ टक्के हिस्सा आहे. नायडू यांचा नातू देवांश यांचा या डेअरी कंपनीत ०.०६ टक्के हिस्सा आहे.
हेरिटेज फूड्सच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी भुवनेश्वरी यांच्या संपत्तीत गेल्या ५ दिवसांत ५७९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर उर्वरित कुटुंबातील सदस्यांच्या संपत्तीत या काळात २९१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या कालावधीत कुटुंबातील सर्व सदस्यांच्या संपत्तीत ८७० कोटी रुपयांची वाढ झाली.