नाशिक : शाळेत अचानक चक्कर येऊन पडल्याने सहावीच्या वर्गात शिकणा-या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पण तिला नेमका त्रास काय झाला? हे अद्याप कळू शकलेले नाही. नाशिकच्या सिडको परिसरातील खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दिव्या त्रिपाठी (वय ११) असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती सहावीत शिकत होती. सोमवारी सकाळी ८ वाजता तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शाळेत बेंचवर बसलेली असताना तिला अचानक चक्कर आली आणि ती बेंचवरून खाली पडली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दिव्या ही उंटवाडी येथील जगताप नगर परिसरात राहते. शाळेचे शिक्षक चैताली चंद्रात्रे आणि वडील प्रतेश त्रिपाठी यांनी तिला उपचारासाठी नाशिकमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.