नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून तरुणाने लोखंडी रॉड डोक्यात घालून गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नागपूरच्या दाभा परिसरात ही घटना घडली आहे. हत्येची ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाली आहे.
हेमलता वैद्य (३० वर्षे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नागपुरातील गिट्टीखदान पोलिस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर आरोपी अक्षय फरार झाला होता. पण पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याला अटक केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हेमलता या पतीच्या मृत्यूनंतर नागपूरमध्ये मुलीसोबत रहात होत्या. हेमलता यांचे अक्षय दाते या तरुणासोबत गेल्या ३ वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघेही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आहेत. पण अक्षय हेमलतावर नेहमी संशय घ्यायच्या. चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत होते.
नेहमीप्रमाणे अक्षय आणि हेमलता यांच्यामध्ये याच कारणावरून भांडण झाले. हेमलता बिल्डिंगच्या खाली पार्किंगमध्ये बसल्या होत्या. त्याचवेळी अक्षय त्याठिकाणी आला. त्याने सोबत लोखंडी रॉड आणला होता. बसल्याठिकाणीच अक्षयने हेमलताला रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. अक्षयने हेमलताच्या डोक्यावर रॉड मारला त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.